मंगळवारी रात्री भर रस्त्यावर गोळ्या झाडून झालेल्या माजी आमदार परशरामभाऊ नंदीहळ्ळी पुत्र अरुण नंदीहळ्ळी यांच्या खुनाच्या तपासासाठी एक स्वतंत्र टीम पोलिसांनी तयार केली आहे. तांत्रिक साधने आणि यंत्रणेचा वापर करून या खुनाचा तपास केला जात आहे.
अरुण यांचा खून झाल्याने मंगळवारी रात्रभर खळबळ माजली. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिराच मृतदेह पोस्टमार्टेम रूमकडे हलवला . त्यांची पत्नी मंगला यांनी हा खून भाऊबंदकीच्या वादातून झाल्याची फिर्याद दिली आहे. याच बरोबर त्यांच्या आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख आला आहे. नोकरीसाठी घेतलेले पैसे टप्प्या टप्प्याने परत दिले जात होते , पण उशीर झाला म्हणून हा खून झाला की त्यांना संपवून भाऊबंदकीतील काटा काढण्यात आला याचा शोध सुरू आहे.
आपल्या कुटुंबात भाऊ बंदकीचे वाद अनेक वर्षांपासून सुरू होते. यातूनच आपल्या पतीला संपविण्यात आले आहे असे त्यांच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हटले असून भाऊ बंदापैकी काहींवर संशय सुद्धा व्यक्त केला आहे. आता खुनाच्या ठिकाणी मोबाईल रेंज चा वापर करून खुन्याचा शोध लावून नंतर खुनाचे कारण शोधावे लागणार आहे.
अरुण नंदीहळ्ळी यांच्यावर काल दुपारी शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ज्या कुणी खून केला त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी अरुण यांच्या कुटुंबाने केली आहे.
खुनाचे कारण काय?
स्वतःच्या स्विफ्ट कारने धामणे येथून अनगोळकडे येत असताना माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचे चिरंजीव अरुण परशुरामभाऊ नंदीहळ्ळी( वय 45) यांचा अज्ञातांनी गोळ्या घालून खून केला आहे. कार अडवून त्यांना बाहेर काढून अज्ञातांनी हा खून केला आहे.
धामणे गावा पासून जवळच हा खून झाला आहे. अरुण हे विश्वभारत सेवा समितीत होते, पिता परशुरामभाऊ यांनी स्थापन केलेल्या संस्थेतील हक्कावरून सुरू वादात त्यांचे तिसरे चिरंजीव असलेल्या अरुण यांचासुद्धा सहभाग होता.
धामणे नजीक रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे. अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला आहे. त्यांना जखमी अवस्थेत येळ्ळूर रोडवर के एल ई हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊन उपचार करण्याचा प्रयत्न झाला पण यश आले नव्हते.
पोलीसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आहे.
अरुण यांना मागील काही दिवसांपासून अज्ञात कॉल येत होते व त्यांचे लोकेशन शोधायचा प्रयत्न सुद्धा सुरू होता. आता पोलिसांनी त्या अज्ञात कॉल्सचे डिटेल्स मिळवण्यास सुरुवात केली आहे.