सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.
आजची स्त्री ही अष्टभुजाधारी दुर्गेचा अवतार आहे. ती एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या पेलू शकते. आजची स्त्री ही व्यावहारिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत प्रगतिकडे वाटचाल करू शकते. करत आहे. हे मत आहे आपल्या बेळगावच्या एमडी (एमडी मेडिसीन)डॉ उज्वला हलगेकर यांचे. अतिशय कष्ट घेत उच्चशिक्षण घेऊन त्यांनी हे स्वतः सिद्ध करून दाखवले आहे.
त्यांचे एमबीबीएस आणि एमडी पर्यंतचे शिक्षण मिरज सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात झाले. प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी शाळा क्र ४ कोरे गल्ली, हायस्कुल बालिका आदर्श विद्यालय आणि कॉलेज जी एस एस येथे पूर्ण केले. त्यांचे कुटुंब मूळचे हट्टीहोळ गल्ली येथील आहे आणि नंतर हिंदवाडी येथे राहायला गेले. वडील डॉ मनोहर चौगुुुले हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनीच त्यांना डॉक्टर होण्याची प्रेरणा दिली.
मराठी मिडीयम मधून शिक्षण घेऊन पुढे सारे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेताना परिश्रम वाटले पण ते शिक्षण त्या आव्हान स्वीकारून पूर्ण करीत गेल्या.
एमबीबीएस झाल्यावर त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच एम डी ला प्रवेश मिळाला आणि पुन्हा शिकायला जावे लागले. एम डी च्या पहिल्या वर्षातच बाळ झालं आणि बाळ झाल्यानंतर विसाव्या दिवशीच पुन्हा शिक्षणासाठी हजर व्हावं लागलं.यामुळे समोर येणारे प्रगतीचे आव्हान आणि कुटुंब यांची सांगड घालत त्यांनी प्रगतीचा मार्ग स्वीकारला आहे. आज महिला दिन असताना त्यांच्या या कर्तृत्वाचा प्रवास इतर महिलांसाठी आदर्श आहे.
पूर्वीच्या काळात महिला दुसऱ्यावर अवलंबून होती. तिला कमी मान व दर्जा होता. तिला कमी महत्व दिले जायचे. पण आता दिवस बदलले आहेत. शिक्षण आणि परिश्रम या जोरावर तिने स्वतःला सक्षम बनवले असून ती स्वतःवर अवलंबून राहू लागली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती मजबूत आणि कणखरपणे समाजात स्वतःच्या पायांवर उभी आहे. असे मत डॉ उज्वला यांनी बेळगाव live कडे मांडले आहे.