Wednesday, January 22, 2025

/

पित्त खडे-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे.
आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण (Oily food) जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं (fibre) प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात.

Dr sonali sarnobat
वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे शिकवले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.
पित्तरसाचे घटक व त्यांची रचना यात बदल घडले की पित्ताचे खडे तयार होतात. अतिरिक्त कोलेस्टेरॉल व पित्तरंगद्रव्य यांची (बाईल सॉल्टस्) कमतरता किंवा असमतोल यामुळे पित्तरस संपृक्त, दाट बनतो व या कोलेस्टेरॉलचे स्फटिकीकरण होऊन खडा तयार होतो. काही विकारांमध्ये फक्त पित्तरंगद्रव्यांचेसुध्दा खडे बनतात. तर काही वेळा दाट घट्ट झालेला पित्तरस पित्ताशयदाहाला कारणीभूत ठरतो.
वाढत्या वयाची स्थूल, रजोनिवृत्ती जवळ आलेली स्त्री, जुनाट बध्दकोष्ठ असलेल्या व्यक्ती, मानसिक तणावाखाली असलेली स्त्री पुरूष, कुपोषित व्यक्ती अशा सर्वांना पित्तखडे होऊ शकतात.

काही विशिष्ट साथीचे रोग होऊन गेल्यावरही पित्ताशयाचा दाह होऊ शकतो. आहारामध्ये कर्बोदकांचे विशेषतः साखरेचे पदार्थ जास्त असल्यास पित्ताशयाचे त्रज्ञस सुरू होतात. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त उष्मांक असलेले मेदयुक्त पदार्थ खाल्याने वाढते व पित्ताचे खडे तयार होण्यास चालना मिळते
पित्ताशयातच खडा असेल व आकाराने लहान असेल तर कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. पण पित्तवाहक नलिकेत जर पित्तखडा अडकला तर मात्र सतत वेदना सुरू होतात. पोटात उजव्या बाजूला दुखणे व उजव्या खांद्याच्या कडेला दुखणे ही लक्षणं पित्तखड्याची निदर्शक असतात. अपचन, गॅसेस, पोट डब होणे, बध्दकोष्टता, मळमळ, भोवळ येणे, कावीळ होणे, अशक्तपणा, चेहर्‍यावर मुरूम येणे ही लक्षणे कमी अधिक फरकाने आढळून येतात.
सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी व एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.
उपाय :—
कुठलीही प्रक्रिया न केलेले नैसर्गिक स्वरूपातील ऑलीव्ह किंवा सूर्यफूल तेल पित्तखड्यावर उपयुक्त आहे. पाव कप सूर्यफूल तेल सकाळी अनशापोटी घ्यावे त्यावर लगेच द्राक्षांचा रस एक कप घ्यावा. गरजेप्रमाणे हा उपचार काही दिवस ते काही आठवडे घ्यावा लागतो.
पीअर हे फळ आता भारतातही सहज उपलब्ध आहे. हे फळ नुसते खाल्याने किंवा रस प्याल्याने पित्ताशयाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
चिकोरी- चिकोरी या झाडाची फुले बिया आणि मुळे ही पित्ताशयाच्या तक्रारींवर वापरतात. यांचा नर्क दिवसातून पाव कप तीन वेळा प्यावा. त्यामुळे शुध्द पित्तरस स्रवतो. पित्तरसाचा संप्रृक्तपणा कमी होतो. यकृत व पित्ताशय या दोन्ही अवयवांसाठी हे चांगले औषध आहे.
मॅग फॉस ६ आणि नॅट्रसल्फ 12 यांचे मिश्रण पित्तखडंयावर उपयुक्त ठरते.
कोलेस्टेरीनम, चायना, चेलीडोनियम, लायकोपोडियम अशी औषधं होमिओपॅथीमध्ये पित्तखड्यासाठी वापरली जातात.
जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.