निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्या नंतर विविध पक्षांच्या वतीनं आपला उमेदवार कोण असावा याची चाचपनी सुरू केली असून कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आलंय.बेळगाव आणि चिकोडीत तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
दोन्ही राजकीय पक्षांनी उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली असली तरी बऱ्याच मतदार संघात उमेदवारी विषयी सहमती नसल्याने बेळगाव चिकोडीची दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवारी जाहीर करणे प्रलंबित ठेवले आहे.राज्यात वेगाने बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या जेष्ठ नेत्यांनी उमेदवारी जाहीर करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे आगामी 18 मार्च नंतरच उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी पूर्वीच्याच खासदारांना उमेदवारी दिली जाईल अशी घोषणा केली असली तरी ऐनवेळी हाय कमांड कडून काही मतदार संघातील उमेदवारांची नावे बदलण्याची शक्यता व्यक्त होताना दिसते त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवारा बाबत देखील अनिश्चितता कायम आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांचे नाव निश्चित मानले गेले असले तरी अंगडी यांना पक्षांतर्गत फार मोठा विरोध आहे.निवडणूक तोंडावर आली असताना अंगडी यांनी रेल्वे ओव्हर ब्रिज व सांबरा विमान तळ याचा आपणच विकास केल्याचा दावा करून त्या कामाचे श्रेय उपटण्याचे काम केले हे सर्वाना
विधितच आहे.तीन टर्म निवडून देऊन कोणतेच भरीव काम त्यांच्या हातून न झाल्याने जनतेत फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यामुळेच भाजपचा कोणताच मोठा स्थानिक नेता त्यांच्या सोबत दिसत नाही यामुळे काँग्रेसने एखादा नवा चेहरा त्यांच्या विरुद्ध रिंगणात उतरवल्यास त्याचा लाभ काँग्रेसला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेळगाव लोकसभा मतदार संघ हा बहू भाषिकांचे प्राबल्य असणारा असून कन्नड बरोबर उर्दू व मराठी भाषिकांचे मते देखील निर्णायक आहे हा विचार समोर काँग्रेसच्या वतीनं ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाला पसंती देण्यात येत आहे.
चिकोडी लोकसभा मतदार संघातून पारंपरिक उमेदवार एकमेका विरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकण्याची शक्यता आहे.मागील लोकसभेत मोदींची लाट असतेवेळी देखील पराभव स्वीकारावा लागलेल्या रमेश कती यांना उमेदवारी देण्याबाबत विरोध झाला होता सध्या तो मावळल्याने रमेश कती यांच्या नावावर शिक्का मोर्तब होऊ शकतो खरं तर काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांच्याशी झुंज देणं म्हणजे कठीच काम आहे.बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवारी वरून सुरू असलेल्या गोंधळामुळे कन्फर्म असलेली हुक्केरी यांची देखील उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
एकूणच बेळगाव जिल्ह्यात दोन्ही मतदार संघात दुरंगी लढती स्पष्ट असून चारी उमेदवार हे लिंगायत समाजातीलच असणार आहेत.
आर्टिकल सौजन्य : प्रशांत बर्डे जेष्ठ पत्रकार