लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही जाहीर होऊ शकते यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन महत्त्वाच्या पक्षातून बेळगाव लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मंडळींनी पक्षप्रमुख आणि वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेऊन आपण कसे निवडून येऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न जोरात सुरू केला आहे यामुळे इच्छुकांच्या बेंगलोर आणि दिल्लीतील वाऱ्या वाढलेल्या असून वेगवेगळ्या नेत्यांच्या मीटिंग घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
काँग्रेसमधून उमेदवारी मिळवण्यासाठी खानापूरच्या आमदार असलेल्या अंजलीताई निंबाळकर ,बेळगाव ग्रामीण आमदार असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची ,माजी खासदार सिदनाळ यांचे सुपुत्र आणि इतर दोघा तिघांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नेतेमंडळींनी स्थानिक पातळीवर सर्वेक्षण केले असले तरी पुन्हा आपला पोर्टफोलीओ नेत्यांसमोर मांडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे .काँग्रेसच्या उमेदवारांच्या इच्छुकांच्या यादीत विधानपरिषद सदस्य विवेक पाटील यांचे सुद्धा नाव आहे. मात्र गेले काही दिवस हे नाव मागे पडले असून नेमकी कुणाला उमेदवारी उमेदवारी मिळणार याची चर्चा जोरात आहे.
भाजपमध्ये चेहरा बदल करण्याची मागणी करून अनेक इच्छुकांनी बेंगलोर दौरे वाढवले असल्याची माहिती मिळाली आहे. काही जण तर थेट दिल्लीला जाऊन आपले वजन पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. उमेदवार सुरेश अंगडी यांना बदलून नवीन चेहरा द्या अशी मागणी होत असताना सुरेश अंगडी यांनी मात्र आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पुन्हा प्रयत्न केले असून ते विद्यमान खासदार असल्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल असा आत्मविश्वास त्यांना आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षातच मोठी लढत होणार असून उमेदवार लिंगायत मराठा की आणखी कोण याचा निकाल या पक्षाच्या वरिष्ठांना लावल्या नंतरच कोण विजयी होणार आणि कुठल्या पक्षाचे बळ वाढणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे. आता मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी जोरात रस्सीखेच सुरू झाली आहे.