प्रशासनाने घातलेला रिंगरोडचा घाट आता अनेकांच्या मुळावर बेतत चालला आहे. त्यामुळे या आधी आणि नंतरच्या लोकप्रतिनिधीनी या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कानाडोळा केला आहे त्यामुळे हा रिगरोड जो प्रयन्त रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याचा निर्धार होनगा आणि बेनाळी येथील शेतकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हा वाढता विरोध या निवडणुकीवर भारी पडणार असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव तालुक्यातील जमीन रिंगरोडमध्ये जाणार आहे. यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवून घेण्यात येत आहेत. यावेळी होनगा आणि बेनाळी गावातील शेतकऱ्यांनी चांगलाच विरोध करून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
होनगा आणि परिसरात अधिकतर शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यावेळी आपल्या हरकती नोंदविण्यासाठी सर्व शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक शेतकऱ्यांनी याला जोरदार विरोध करून आपला निषेध नोंदवला आहे. मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय अनेकांचा ताप वाढविणारा ठरला आहे.
होनगा बरोबरच परिसरातील गुंजेनहट्टी, देवगिरी या गावातील शेतकऱ्यांनी आपला विरोध नोंदविला आहे. या भागातील शेतजमीन ही तिबार पिकांची आहे. त्यामुळे येथील शेतजमीन गेल्यास येथील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे ही जमीन आपण बळकावू देणार नाही, असा पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.
आपले प्राण गेले तरी चालतील पण जमीन देणार नाही, असे यावेळी ठणकावून सांगण्यात आले. ही जमीन नसून आमची आई असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आपली जमीन कधीच देणार नसल्याचे आपल्या हरकतीत नोंदवून निषेधही व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका पंचायतीचे माजी सदस्य किरण पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.