स्वच्छ शहर सुंदर शहरासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण या सर्वेक्षणात संपूर्ण देशात बेळगाव शहर फारच मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेल्याचे दिसून येत आहे. बेळगावचा क्रमांक या स्पर्धेत 277 वा आला आहे, यामुळे शहरात स्वच्छता यंत्रणा राबवण्यात प्रशासन किती कमी पडत आहे हेच उघड झाले आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन योजनेतून स्वच्छ सर्वेक्षण 2019 हा उपक्रम आयोजित केला होता. त्यासाठी प्रत्येक शहराला निधी देखील मंजूर करण्यात आला. वैयक्तीक शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचऱ्याचे उचल अशा वेगवेगळ्या बाबतीत हे सर्वेक्षण झाले.
महानगरपालिकेला स्वतःचा निधी असताना आणि वाढीव निधी मिळालेला असतानाही बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या बाबतीत महानगरपालिका कमी पडल्याचे यामधून दिसून उघड झाले आहे. नागरिकांनी जमा केलेला कचरा वेळेत उचलून योग्य ठिकाणी पोहोचविण्याची बाबतीत महानगर पालिकेला अपयश आल्यामुळेच बेळगाव शहराची पिछाडी झाली आहे ,त्यामुळे यापुढील काळात महानगरपालिकेने अतिशय जबाबदारीने स्वच्छतेचे काम हाती घेण्याची गरज आहे.