केवळ मनोहर पर्रीकरंच नव्हे तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पासून आताचे प्रमोद सावंत यांच्या पर्यंत अकरा मुख्यमंत्र्यांनी बेळगावशी जवळीक आणि आगळं वेगळं नातं जपलं होत. बांदोडकर ते सावंत पर्यंतचा आढावा घेण्याचा बेळगाव live चा प्रयत्न आहे.
गोवा पोतुर्गीजांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी झालेल्या संग्रामात बेळगाव व खानापूर येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बहुमोल मदत केली. याशिवाय बेळगाव मधूनच गोवा स्वातंत्र्याच्या लढ्याच्या सैनिकांना अन्नाची रसद युद्धाची शस्त्रे पुरवण्यात आली होती.
गोवा मुक्ती नंतर पहिले मुख्यमंत्री बनलेले स्वर्गीय दयानंद बांदोडकर यांचा व बेळगावचा विशेष संबंध होता. आपल्या दहा वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा बेळगाव व खानापूर मधील अनेक संस्थांच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. इतकेच काय तर बेळगाव खानापूर आणि चंदगड मधील शेकडो शिक्षकांना गोव्यात बोलावून नोकरी दिली होती. खानापूरचे माजी आमदार कै. बिरजे गुरुजी यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. बांदोडकरांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यास बेळगावचे बसवाणी बँड गेले होते. त्या नंतरच्या मुख्यमंत्री झालेल्या बांदोडकर यांची कन्या शशिकला काकोडकर यांचा बेळगावशी म्हणावा तेवढा थेट संबंध आला नाही.
गोवा राज्य हे केंद्रशासित प्रदेश असताना आणि स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आल्या नंतर तब्बल सात वेळा मुख्यमंत्री पद मिळवून 17 वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेले प्रतापसिंह राणे यांचाही बेळगावशी जवळचा संबंध होता. बेळगाव खानापूर तालुक्यातील अनेक संस्थांच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असायची. ज्या सुरल शी बेळगावच्या तरुणांचा कायम संबंध यायचा तेथूनच आजही राणे निवडून येतात.
दिगंबर कामत यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत बेळगावला दोन ते तीनदा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावली.2013 मध्ये गोवा राज्याच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने मराठा मंदिर येथील आयोजित कार्यक्रमात त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती.
नुकतेच दिवंगत झालेले मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषवले होते. आपल्या साडे नऊ वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेकवेळा बेळगावला भेटी दिल्या.बेळगाव गोवा मैत्री संघाची स्थापना त्यांनीच केली होती जेणेकरून बेळगाव गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढत जावो हा त्या मागचा उद्देश्य होता त्यांच्या व्यवसायामुळे बेळगावातील अनेक उद्योजक त्यांचे मित्र होते.मध्यंतरीच्या काळात चर्चिल आलेमाव,लुईसप्रीत आबोझा, रवी नाईक,डॉ विल्फ्रेझ डिसोझा,लुईझिन फरेरो, लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्री पद भूषवले होते मात्र बेळगाव शी त्यांचा म्हणावा तेवढा राजकीय आणि सामाजिक संबंध आला नाही.
नुकतेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले डॉ प्रमोद सावंत यांनी सभापती असताना अनेकदा बेळगाव व खानापूरला भेटी दिल्या होत्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी बेळगाव खानापूर भाजपसाठी सक्रिय प्रचार केला होता. पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी बेळगावशी दृढ नाते जपले होते. नंतर प्रतापसिंह राणे यांचा वारसा मनोहर पर्रीकर यांनी पुढे चालवला होता आता इथून पुढचे मुख्यमंत्री देखील तो जपतील अशी आशा व्यक्त करूया…