मनुष्य उपकार करून विसरून जातो पण ज्याच्यावर उपकार झालेले असतात तो कधीच विसरू शकत नाही. जीवनाच्या एका क्षणी उपकारकर्त्याचे आभार मानण्याची वेळ येते. अशीच वेळ आलेल्या समद खानापूरी यांनी बेळगावातील ज्येष्ठ वकील राम आपटे यांचा सत्कार केला.या सत्काराचे कारण आणि राम आपटे यांनी केलेल्या उपकारांची माहिती खानापूरी यांनी बेळगाव live ला दिली आहे.
जीवनात राम आपटे यांनी केलेल्या छोट्याश्या मदतीमुळे समद खानापूर उर्दू शिक्षक साहित्यिक बनले अन हजारो विद्यार्थी घडवले.या उपकाराची परतफेड समद खानापुरी यांनी राम आपटे यांचा हृद्य सत्कार करून केला आहे.आज समद खानापूरी यांचं वय 75 आहे गेल्या 63 वर्षा पूर्वी केलेल्या मदतीची त्यांनी सत्कार करून परतफेड केली आहे.
समद खानापूरी हे उर्दू साहित्यिक व पत्रकार आहेत. उर्दूत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यापैकी एक पुस्तक 267 पानांचे असून ते नुकतेच प्रकाशित झाले आहे ही त्यांच्या पहिल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून “बेलगाम तारीख के आईने मे” असे त्या पुस्तकाचे नाव आहे.या पुस्तकाला वाचकांनी पसंत केले असून अमेरिकेतील सायन्स लायब्ररी मध्ये हे पुस्तक जतन करून ठेवलेले आहे.
1956 – 57 मध्ये इस्लामीया हायस्कुल मध्ये समद खानापूरी हे शिकत होते. पाचवी ते नववी पर्यंत त्यांनी तेथे शिक्षण घेतले आहे. त्याचवेळी त्यांचे वडील मोहियोद्दीनसाब खानापूरी यांनी एक आदर्श शिक्षक महम्मदअली शहाबुद्दीन मक्तेदार यांच्यासोबत बाशीबन हायस्कुलची पायाभरणी केली. बाशीबन हायस्कुलसाठी ते विद्यार्थी जमा करत होते. आपण आपल्या या शाळेसाठी दुसऱ्यांच्या मुलांना जमा करत असताना आपल्या मुलांनाही का घेऊ नये असा विचार करून नववीत असलेल्या समद खानापूरी यांचे नाव इस्लामीया हायस्कुल मधून कमी करून घेऊन त्यांनी बाशीबन हायस्कुल मध्ये भरती केले.
इस्लामीया मधील त्यांचे 9 मित्र सुद्धा बाशीबन ला आले. दहावीत आल्यावर एस एस एल सी परीक्षेला बसण्याचा प्रश्न निर्माण झाला. कर्नाटक सरकारने परीक्षेला बसता येणार नाही असा निर्णय घेतला. त्यांचे म्हणणे होते की बाशीबन हायस्कुल मान्यताप्राप्त नाही.त्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही या निर्णयाने जीवन उध्वस्त होण्याची वेळ आली होती.त्यावेळी राज्यांची पुनर्रचना झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वकील राम आपटे यांनी मराठी वृत्तपत्रात एक स्टेटमेंट दिले होते की सीमाभागातील विद्यार्थी पुणे किंव्हा महाराष्ट्रातून परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी संपर्क साधावा. राम आपटे यांना भेटल्यावर त्यांनी समस्या ऐकून महाराष्ट्रातून एस एस सी करू शकता असे सांगून 11 विध्यार्थ्यांना कोल्हापूर मध्ये परीक्षा केंद्राची व्यवस्था करून देण्यात आली.त्यामुळे आपला पुढील प्रवास होऊ शकला. असे समद खानापूरी सांगतात.
त्यावेळी समद खानापूरी हे 16 वर्षांचे होते, त्यानंतर त्यांना राम आपटे यांना भेटायचे होते पण ते शक्य झाले नाही. पण त्यांनी स्वतः भेटून या उपकारांबद्दल आभार मानले आहेत. राम आपटे यांचा त्यांनी हृदयपूर्वक सत्कार केला आहे.