मनपाचे नाक दाबल्यावर उघडले तोंड
कुणी कसे केंव्हा आणि कशा पद्धतीने दाबले नाक? वाचा फक्त बेळगाव live
खेळण्यासाठी मैदाने शिल्लक नाहीत आणि शिल्लक मैदानांवर सामने भरवण्यास परवानगी देत नाही. या प्रकाराने चिडलेल्या क्रिकेटप्रेमींनी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून मनपा चे नाक दाबले आहे. मनपाच्या महसूल विभागातच क्रिकेटचा खेळ खेळण्यात आला. हे अश्यपद्धतीने नाक दाबल्यावर तोंड उघडावेच लागले आणि क्रिकेट स्पर्धेसाठी मैदानाची परवानगी घेऊन हे क्रिकेटप्रेमी बाहेर पडले आहेत.
पॅरी इलेव्हन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महाद्वार रोडवरील संभाजी उद्यानावर आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी मैदानाची परवानगी मागण्यास काल काही कार्यकर्ते मनपाच्या महसूल विभागात गेले होते. यावेळी हे मैदान फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखीव असून क्रिकेट साठी देऊ शकत नाही असे सांगण्यात आले. तेंव्हा या युवकांनी माजी नगरसेवक
सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण यांच्याकडे आपली समस्या मांडली. क्रिकेट सामने भरवण्यास मैदान देत नसतील तर मनपा मध्येच जाऊन क्रिकेट खेळूया अशी योजना आखण्यात आली.
नगरसेविका वैशाली हुलजी,सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण यांच्याबरोबरच दत्तप्रसाद जांबवलीकर, काशिनाथ हिरेमठ, राकेश कलघटगी व इतर युवक मंडळी सहभागी झाली होती.
हा क्रिकेट सामना मनपाच्या
महसूल विभागात सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांना काय करायचे हेच समजले नाही आणि त्यांनी लवकरात लवकर परवानगी देऊन टाकली. सरळ मागायला गेल्यावर दिले नाही त्यामुळे या तरुणांना हा मार्ग स्वीकारायला लागला आणि ज्या कार्यालयात फक्त फायली असतात तेथे पहिल्यांदाच बॅट बॉल आणि स्टॅम्प फिरले.