शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि गेली ३०० ते ४०० वर्षे येळ्ळूर गावच्या कुशीत राजहंसगड जपून ठेवलेली माती चोरली जात आहे. अलारवाड ते खानापूर पर्यंत महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने रात्रीच्या वेळी हजारो टन माती खोदून ती चोरण्याचा कारभार सुरू केला आहे. शिवकालीन आणि नैसर्गिक असा गड संपवून टाकण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे अन्यथा गडाला धोका होऊ शकतो याकडे प्रत्येक शिवप्रेमीने लक्ष देण्याची गरज आहे.
या गडाच्या पायथ्याशी असलेला डोंगर भाग जेसीबी लावून रात्री खणला जात असून तेथील माती चोरली जात आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. या गडाच्या आजूबाजूला खोदाई करण्याचा कुठलाही अधिकार नसताना आणि परवानगी सुद्धा न घेता हा बेकायदेशीर कारभार सुरू झाला आहे. रात्रीच्या वेळी आजूबाजूची गावे शांत झाल्यावर जेसीबी आणून हे कारभार केले जात असून याची छायाचित्रे बेळगाव live कडे मिळाली आहेत.
महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला माती कमी पडत असून त्यांनी देसुर मार्गे ती चोरून नेण्याचे काम सुरू केले आहे.
ही कंपनी किल्ल्याचं अस्तित्व नष्ट करत असून शिवप्रेमी नागरिकांनी जागे होण्याची गरज आहे. कालच येळ्ळूर येथील जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी याबद्दल आवाज उठवला आहे. या कंपनीकडे अशी माती उपसून घेऊन जाण्याची कोणतीच परवानगी नाही असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच तहसीलदार, प्रांताधिकारी व इतर अधिकाऱ्यांना हे कळवले आहे. कोणत्याही पद्धतीने काम थांबले पाहिजे अशी त्यांची मागणी असून काम न थांबल्यास माती घेऊन जाणाऱ्या वाहनांसमोर कार्यकर्त्यांसोबत झोपून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या गडावर रात्रीची कोण करतय चोरी? याचा योग्य तपास लावून कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.