Sunday, January 12, 2025

/

जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास प्रारंभ, हजारोंची उपस्थिती. संपूर्ण शहर कृष्णमय*

 belgaum

*जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास प्रारंभ, हजारोंची उपस्थिती. संपूर्ण शहर कृष्णमय*

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या बेळगाव शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एकविसाव्या भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास शनिवारी दुपारी दोन वाजता प्रारंभ झाला. धर्मवीर संभाजी चौकात सजविलेल्या रथात भगवान जगन्नाथ, बलदेव व त्यांची भगिनी सुभद्रा यांचे अर्चविग्रह बसविण्यात आले होते .रथाच्यासमोर बांधलेल्या मोठ्या दोरखंडाने हजारो भक्तगण उत्साहाने रथ पुढे ओढत होते.

इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी राम गोविंद महाराज, भक्ती रसामृत स्वामी महाराज याचबरोबर दयाल चंद्र आणि वृषभान प्रभू या मुंबईहून आलेल्या भक्तांच्या हस्ते पूजा करून रथास चालना देण्यात आली. या सर्व महाराजांची संभाजी चौकात भाषणे झाली. ‘बेळगावच्या जनतेचे कल्याण करण्यासाठी या जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येते या अतिशय सुंदर महोत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे’ असे आवाहन भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी केले तर ‘मंदिरात येऊ न शकणाऱ्या भक्तांना स्वतःहून दर्शन देण्यासाठी भगवंत रस्त्यावर उतरले आहेत’ असे राम गोविंद प्रभू म्हणाले.

Iskcon
रथासमोर सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत पुढे रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या घालणारे पथक कार्यरत होते. त्यांच्या मागोमाग सजवलेल्या बैलजोड्या, भगवंताच्या जीवनावरील अनेक प्रसंगांचे वर्णन करणारे देखावे सादर करण्यात येत होते. त्यापाठोपाठ भगवंताच्या नामाचा महामंत्र जपणारी भजन पथके भगवंताच्या नामात मंत्रमुग्ध होऊन गेली होती.

जय जगन्नाथ,जय बलदेव,जय सुभद्रा आणि “हरे कृष्णा,हरे कृष्णा,कृष्णा कृष्णा हरे हरे,हरे राम हरे राम ,राम राम हरे हरे” असा नामघोष करीत रथयात्रा संभाजी चौकातून निघून कॉलेज रोड, समादेवी गल्ली ,खडेबाजार गणपत गल्ली मार्गे आता मारुती गल्लीत पोहोचली असून रामलिंग खिंडीतून शनि देवळाकडून ब्रिजवरून शहापूर मार्गे गोवावेस व तेथून इस्कॉन मंदिराला पोहोचणार आहे .तेथे सायंकाळी विविध उपक्रम होणार आहेत.

रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर वाटेत पाणी, दूध, रस व फळांचे वाटप करण्यात येत होते .यात्रेवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली जात होती. अत्यंत शिस्तबद्ध रित्या निघालेल्या या यात्रा महोत्सवात काही परदेशी भक्तही सहभागी झाले आहेत.रथाच्या मागील बाजूस एक स्वच्छता पथक कार्यरत होते .रस्त्यावर पडलेला केरकचरा व ग्लास आधी उचलून रस्ता साफ करण्याचे काम ते पथक करत होते.

न्यूज अपडेट सौजन्य:अनंत लाड

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.