हायवे ओलांडताना न्यू गांधी नगर फ्रुट मार्केट जवळ झालेल्या अपघातात कुबेब अनिस शेख या 13 वर्षीय मुलाचा अंत झाला होता गेल्या सहा महिन्यात फ्रुट मार्केट जवळ हायवे ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत हे अपघात का वाढवलेत याला जबाबदार कोण नियंत्रण आणण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
बेळगाव शहराला जोडून जाणाऱ्या महामार्गावर भरपूर अपघात होत आहेत. धोकादायक पद्धतीने महामार्गावर वाहनांची धडक बसून अनेक निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महामार्ग झाल्यापासून गांधी नगर ते महंतेश नगर ब्रिज यादरम्यान 26 जणांचा मृत्यू झाला असून या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न आहे. महामार्ग चुकीच्या पद्धतीने ओलांडणे ही चूक असली तरी असे ओलांडणारे मारले जाऊ नयेत म्हणून फेन्सिंग घालण्यात आले होते. ते वारंवार काढण्यात येते आणि महामार्ग ओलांडला जातो हे निदर्शनाला आले आहे. दोन दिवसापूर्वी निष्पाप बळी गेला ,त्यापूर्वी एक मुलगी याच प्रकारच्या महामार्गावरील अपघातात बळी गेली होती. शहराला लागून असलेल्या महामार्गाकडे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे नाराजी आहे.
महामार्गाच्या आजूबाजूने वसाहती आहेत या वसाहतीतील लोक एक बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडण्याचा निर्णय घेतात. हा धोकादायक निर्णय त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो या जीवघेण्या निर्णयाकडे नागरिक वळू नयेत म्हणून महामार्ग ओलांडताच येऊ नये आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी ब्रिजचा वापर करावा अशी मागणी आहे.
मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते बळी गेल्यानंतर तीन ते चार दिवसाची चर्चा होते मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते याकडे आता पोलीस प्रशासन महानगरपालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महामार्ग वाहने वेगाने जाण्यासाठी असला तरी शहरा जवळून जात असताना या वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्याचीही गरज आहे.