खानापूर तालुका सरकारी असोसिएशनच्यावतीने खानापूर पीडब्ल्यूडी ऑफिस समोर सोमवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व सरकारी कंत्राटदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे.
यात प्रामुख्याने पहिली मागणी अशी आहे की स्थानिक पातळीवरील सर्व सरकारी कंत्राट कामेही स्थानिक कंत्राटदारांनाच मिळावी तसेच इतर सरकारी कार्यालयांमध्ये फोफावत चाललेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मागील तीन ते चार वर्षापासून एकाच सरकारी कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करावी. पीडब्ल्यूडी विभागातील इंजिनीयर नूतन वैद्य या गेल्या दहा वर्षापासून खानापूर येथेच पीडब्ल्यूडी खात्यामध्ये कार्यरत आहेत व आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आपल्या पतिराजांना सरकारी कंत्राट कामे मिळवून देण्यास मदत करत आहेत व यामुळे स्थानिक कंत्राटदारांना काम मिळणे अवघड होत चालले आहे यामुळे कित्येक कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे अशा आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिकारांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी सर्व कंत्राटदार करत आहेत.
ग्रामपंचायत असो किंवा तालुका पंचायत व जिल्हा पंचायत सदस्य हे स्वतः कायद्याचे उल्लंघन करून कंत्राट काम करत आहेत व सरकारी कामांचा दर्जा अत्यंत निकृष्टपणे करून अतिरिक्त मलिदा मिळवू पाहत आहेत अशा पंचायत सदस्यांवर त्वरित कारवाई व्हावी व त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशी मागणी खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी खानापूर तालुक्याचे माजी आमदार व महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री दिगंबर राव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विचारपूस केली तसेच इतरही राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी येऊन सत्याग्रह स्थळी आपला पाठिंबा खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार असोसिएशन व्यक्त केला