मराठी भाषा ,संस्कृतीचे जतन व्हावे आणि दुर्गम भागातील आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने भाई दाजीबा देसाई यांनी १९६५ साली दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाची स्थापना केली.तेव्हापासून आजपर्यंत अनेक पिढ्या साक्षर करण्याबरोबरच मराठी भाषा आणि संस्कृती जतन करण्याचे मोलाचे कार्य संस्था करत आहे.
सीमाभागात कर्नाटक शासनाच्या दडपशाही आणि अन्यायाला तोंड देत विद्यादानां बरोबर मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन करण्याचे कार्य मंडळ करत आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच मराठी अभ्यास केंद्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे .
भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला.या अन्यायाविरुद्ध सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या त्रेसष्ट वर्षांपासून मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देत आहेत.सध्या सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.मराठी भाषिकांचे गेल्या सहा दशकापासून कर्नाटक सरकार खच्चीकरण करत आहे.कन्नड सक्ती,सरकारी मराठी कागदपत्रांचे कानडीकरण ,मराठी फलक हटवून कन्नड फलक लावणे,अल्पसंख्यांक भाषिक आयोगाचा मराठीतून कागदपत्रे देण्याचा आदेश डावलणे, मराठीतून बोलल्यास कन्नडमध्ये बोला असे सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाणे अशा एक की दोन अन्यायाना तोंड देत मराठी भाषिक आपला लढा देत आहेत.मराठी भाषा आणि मराठी संसकृतीचे खच्चीकरण करण्याची एकही संधी कर्नाटक सरकार सोडत नाही.अशा परिस्थितीत मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणे म्हणजे एक मोठे आव्हानच आहे.अनेक संघटना आणि शिक्षण संस्था आपापल्यापरीने मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचे कार्य सीमाभागात करत आहेत.दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने देखील अनेक अडचणी आणि आव्हानावर मात करून शिक्षण देण्याबरोबरच मराठी जपण्याचे कार्य करत आहे.त्याची दखल घेऊनच महाराष्ट्र सरकारने या संस्थेला पुरस्कार जाहीर केला आहे.आजवरची दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाची वाटचाल कौतुकास्पद आहे.शहराबरोबरच खेडेगावातही शिक्षणाची ज्ञानगंगा पोचविण्याचे कार्य मंडळ करत आहे.बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्राचाच भाग आहे हे दर्शविण्यासाठी भाई दाजीबा देसाई यांनी संस्थेचे नाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ असे ठेवले .
भाई दाजीबा देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६५ साली दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाची स्थापना केली .ग्रामीण भागातील मुलांची विशेषतः मुलींची शिक्षणाची सोय करणे आणि त्यांना उच्च शिक्षण घेता यावे हाच मुख्य उद्देश होता . १९६५ साली संस्थेची स्थापना झाली तरी काही अडचणीमुळे ज्योती महाविद्यालयाची स्थापना १९६९ मध्ये झाली . महात्मा ज्योतिराव फुले या नावावरूनच महाविद्यालयाला ज्योती महाविद्यालय हे नाव देण्यात आले आहे . महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले ,राजर्षी शाहू महाराज ,कर्मवीर भाऊराव पाटील,कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे या थोर विचारवंतांच्या तत्वावर चालणारी संस्था असावी असा दाजीबा देसाईंचा आग्रह होता . आणि त्याच तत्वावर संस्थेची वाटचाल सुरु आहे . तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लीजवर अठरा एकर जागा मिळवून दिली . उध्दवराव देसाई,एम . आर . देसाई आणि अनेकांनी तेव्हा मदत केली . भाई एन . डी . पाटील यांचाही प्रारंभापासून सहभाग होता . १९६५ ते १९८५ पर्यंत भाई दाजीबा देसाई यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली . १९८५ ला दाजीबा देसाई यांचे निधन झाल्यावर भाई एन . डी . पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारले .
ज्योती महाविद्यालयाला कर्नाटक विद्यापीठाची मान्यता मिळण्यास विलंब झाला आणि १९७३ मध्ये मान्यता मिळाली . १९६९ ते १९७३ या कालावधीत ज्योती महाविद्यालयाचे विद्यार्थी बहिस्थ विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेला बसत होते . प्रारंभी कला आणि वाणिज्य शाखा सुरु केल्या . १९८३ मध्ये विज्ञान शाखा संस्थेने सुरु केली . प्रारंभी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता पण नंतर प्रतिसाद चांगला मिळाला . १९७३ पासून ग्रामीण भागात शाळा सुरु करण्यास संस्थेने प्रारंभ केला .त्याकाळी ग्रामीण आणि दुर्गम भागात मुले शिकत होती पण मुलींचे शिक्षण चौथी किंवा सातवीनंतर थांबत होते . बेळगाव ,खानापूर,हुक्केरी आणि चंदगड तालुक्यात आज संस्थेच्या ३२ माध्यमिक शाळा आहेत . केवळ एकच शाळा मराठी विद्यानिकेतन ही बेळगाव शहरात आहे आणि उर्वरित ग्रामीण भागात आहेत . बीसीए ,बीबीए , एम एस्सी ,एम कॉम हे अभ्यासक्रम देखील संस्थेने सुरु केले आहेत . विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी म्हणून ज्योती अकादमी सुरु करण्यात आली आहे . २०१६ मध्ये भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये सत्यशोधक अध्ययन केंद्र स्थापन करण्यात आले आहे .
भाई दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनी व्याख्यानाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते . महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते . वि . गो . साठे प्रबोधिनी आणि मराठी विद्यानिकेतन यांच्यातर्फे गेल्या सतरा वर्षांपासून बालकुमार साहित्य संमेलन घेण्यात येत असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे . होतकरू गरीब विद्यार्थ्यांना आणि मराठी विषय घेणाऱ्यांना प्रतिष्ठानतर्फे मदत केली जाते . मराठी विषयात प्रथम येणाऱ्यांना बक्षिसे दिली जातात . शिक्षकांच्यासाठी मराठी विषयाची कार्यशाळा घेण्यात येत असून भविष्यात विद्यार्थ्यांसाठी देखील कार्यशाळा घेण्यात येणार आहे .अनेक मराठी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे . सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे कोडगू आणि केरळच्या पूरग्रस्तांना तीन लाखाची मदत देण्यात आली आहे . पर्यावरण संरक्षणाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त गणपती आणि दिवाळी साजरी करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात येते . विद्यार्थी आणि शिक्षक दिवाळीच्यावेळी फराळ गोळा करून त्याचे वितरण झोपडपट्टीत केले जाते . शिक्षक आपल्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम देतात त्यातून गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली जाते . कर्मचारी कल्याण निधीसाठी देखील कर्मचारी ठराविक रक्कम देतात त्यातून वैद्यकीय मदत आणि एखाद्याचे अचानक निधन झाल्यास त्वरित मदत दिली जाते .
१९ मे २०१९ पासून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असून त्यानिमित्ताने वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे . भाई दाजीबा देसाई भवन नावाने ६५० बैठक व्यवस्था असणाऱ्या अद्ययावत सभागृह बांधण्याचा प्रकल्प सुरु आहे . त्याशिवाय सुसज्ज नूतन ग्रंथालय भविष्यात उभारण्यात येणार आहे . सध्या संस्थेचे अध्यक्ष भाई एन . डी . पाटील ,उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील ,सचिव सुभाष ओऊळकर ,सहसचिव प्रा . विक्रम पाटील ,खजिनदार एन . बी . खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु आहे .
आर्टिकल सौजन्य: विलास अध्यापक महाराष्ट्र टाइम्स बेळगाव
खूप छान
मला अभिमान आहे अशा संस्थेचा मी एक कर्मचारी आहे