रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या वाहनांचे पार्किंग करण्यासाठी जादा शुल्क आकारणी करून ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. या विरोधात शुक्रवारी भ्रष्टाचार निर्मुलन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वकील नामदेव मोरे यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी स्टेशन मास्टर एस. बी. कुलकर्णी यांनी शुल्क आकारणाऱ्या कंत्राट दाराला बोलावून हा कारभार बंद करा अश्या सूचना दिल्या आहेत.
पार्किंग तिकिटावर प्रत्येक सहा तासाला पाच रुपये असा दर असताना सहा तासाला दहा रुपये आकारणी केली जात आहे. त्यांच्याकडून दुप्पट तिकीट दर आकारणी केली जात असून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वीही अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, यामुळे यांच्यावर कोणाचा वचक नाही असेच यातून दिसते.
बेकायदेशीर पैसे वसूल करणाऱ्या कंत्राट दाराला भ्रष्टाचार समितीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता हे असच आहे अस सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार झाला. या बाबत या अगोदर थेट रेल्वे मंत्र्या पर्यंत तक्रारी गेल्या आहेत मात्र अद्याप हा लुटीचा प्रकार बंद होताना दिसत नाही.
यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली. यावेळी कुलकर्णी यांनी संबधीत शुल्क आकारणी करणाऱ्या व्यक्तीला बोलावून जाब विचारला. त्या व्यक्तींनीही वाहनचालक लवकर आले तर पैसे परत देतो असे सांगितले. व वेळ मारून नेली. यावेळी सदस्य संतोश सुतार, धाकलू ओऊळकर आदी होते.