लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव नव्हे तर हुबळी येथून करणार आहेत. कर्नाटकात दोन ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत यापैकी 10 फेब्रुवारीची सभा बेळगावला होणार अशी हवा झाली होती पण भाजप वरिष्ठांनी पूर्ण अभ्यास करून ही सभा हुबळीला हलवली असून दुसरे ठिकाण अजून ठरायचे आहे.
खरेतर 10 तारखेला हावेरीला सभा होणार होती.तसे नियोजन सुरू होते. पण तेथील सभा रद्द झाल्यामुळे बेळगावला आणण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांना बेळगावला आणण्याचे आणि विरोधकांना शांत करण्याचे प्रयत्न झाले पण बेळगावचा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबद्दल भाजप तर्फे पूर्ण अभ्यास करून निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाजप गोटातून मिळाली आहे.
मोदी येणार म्हणजे तितके लोक जमले पाहिजेत पण उमेदवार निवडीवरून बेळगावच्या भाजपमधील असूंतुष्ट लोकांची संख्या जास्त झाल्याने हा दौरा रद्द झाल्याचे बोलले जात आहे.
यामुळे यावेळीही आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि संधी साधून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला हा मोठा सेटबॅक बसल्याचे बोलले जात आहे.
हुबळीचे खासदार प्रल्हाद जोशी हे राजकीय दृष्ट्या बळकट आहेत. जनतेत सुद्धा त्यांची चांगली छाप आहे. बेळगावमध्ये हे शक्य झाले नाही याचा विचार भाजपने केला आहे. मोदींचे येणे ही भाजप पक्षासाठी जमेची बाजू असली तरी त्यामुळे उमेदवार निवडीवर शिक्कामोर्तब होऊन पक्षाचे नुकसान होईल हा विचार झाला असून अजूनही उमेदवार बदलला जाऊ शकतो हे सुद्धा त्यातून दिसत आहे.