बेळगाव शहर आणि परिसरात मटका व जुगाराला ऊत आला आहे .शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये बेमालूमपणे मटका जुगार घेतला जात असून वरिष्ठ अधिकार्यांच्या आशीर्वादातूनच हे प्रकार सुरू असल्याची माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक व इतर अधिकारीही वरिष्ठांच्या आदेशामुळे मटक्याला आशीर्वाद देत असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून मटका व जुगार थोड्या प्रमाणात बंद झाला होता. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरून मटका बुकी व जुगारी आपले काम सांभाळत होते . प्रामाणिक अधिकार्यांनी हप्ते नको पण मटका आवरा अशी सूचना सर्व पोलीस निरीक्षक यांना दिली होती. मात्र आता वाटेल ते सुरू करा पण मला पैसे आणून द्या असे सांगणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचाही चांगलाच फायदा आहे.
त्यांनी मटका जुगार चालवणार्यांना एक प्रकारे आशीर्वाद दिल्याची अवस्था आहे. वरिष्ठांना द्यायचा हप्ता बाजूला ठेवून स्वतःचे खिसे भरून घेण्याचे प्रकार सुरू झालेत.
बेळगाव शहराच्या सर्व प्रमुख पोलिस हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका घेतला जात असून जुगाराचे अड्डेही जोरात सुरू आहेत. खडेबाजार, मार्केट, शहापूर, माळ मारुती , टिळकवाडी, उद्यमबाग व इतर अनेक पोलीस स्थानकांच्या हद्दीत हा गैर धंदा चालवला जात आहे. मटका बुकी व मटका चालवणारे यांचे जाळे विणुन देण्याचे काम काही पोलिसच करत असल्यामुळे त्यांचा धंदा जोरात सुरू झाला आहे हप्ता मिळाला की झाले या पोलिस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे तरुण पिढी मटका आणि जुगार च्या नादात असून हमाल व रोजंदारीवर काम करणारे लोक मिळणारा तुटपुंजा पैसा मटक्यात घालून भिके कंगाल होऊन बसू लागले आहेत .
पोलिस दलाने मटका जुगार बंद करण्याची गरज आहे मात्र समाजाचे काही झाले तरी चालेल पण आपले खिसे भरले की झाले अशी भूमिका काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सुरू केल्यामुळे मटका जोरात सुरू झाला असून याकडे कोण लक्ष देणार की नाही याचे उत्तर आता सरकारी पातळीवर विचारावे लागणार आहे.
गुन्हेगारांवर वचक ठेवणारे सिंघम अधिकारीही शांत असल्याने आता हा गैर धंदा फोफावत चालला असून ते शांत का याचे कारण राज्याच्या गृह खात्याने शोधून काढावे लागेल.