हवाई उड्डाण क्षेत्रामध्ये नव्यानेच दाखल झालेली कंपनी स्टार एयर. या कंपनीने कालच बेळगाव बेंगळूर विमानसेवा सुरू केली. या विमानसेवेसाठी निवडला बेळगाव चाच पायलट त्याचे नाव आहे ऋषिकेश पाटील.
कोण आहे हा ऋषिकेश पाटील? याचा शोध घेतला त्यावेळी समजले ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पाटील यांचा तो चिरंजीव. एका पत्रकाराचा मुलगा ते पायलट हा प्रवास फक्त विजयकुमार पाटील यांच्यासाठीच नव्हे तर प्रत्येक सामान्य वर्गातील व्यक्तीसाठी आदर्श आहे. यामुळे ऋषिकेशचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. बेळगावातील प्रत्येक सामान्य वर्गातील मुलाने पायलट होण्याचे स्वप्न पाहण्याची ऊर्जा देणारी ही कहाणी बेळगाव live तुमच्या समोर मांडत आहे .
तीन चार वर्षाचे असताना लहानपणी जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा सगळेच विचारतात, की मोठा झाल्यावर काय होणार? तेव्हा प्रत्येकाच्या तोंडातून अनेक उत्तरे येतात. त्यातले एक उत्तर असते मी पायलट होणार .पण प्रत्येकालाच पायलट होता येत नाही .लहानपणी मी पायलट होणार असे सांगणाऱ्या ऋषिकेश पाटील ने जे स्वप्न पाहिले ते साध्य करून दाखवले त्यामुळे त्याची कहाणी आदर्श आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक होतकरूने आदर्श घेण्यासारखा आहे.
पत्रकार विजयकुमार पाटील हे मूळचे बिदरचे. ऋषिकेश तीन वर्षाचा होता तेव्हा बिदर येथे विमानतळावर पायलटना प्रशिक्षण दिले जाई. सूर्यकिरण या फायटर प्लेन वर हे प्रशिक्षण सुरू असायचे. ऋषिकेश छोटा असताना घरावरून सूर्यकिरण विमाने जायची आणि त्यातूनच त्याने प्रेरणा घेतली.
आई-वडील आणि मोठी बहीण यांच्याकडून प्रचंड प्रोत्साहन मिळाल्यामुळे ,मैसूर व बेळगाव मध्ये केंद्रीय विद्यालयात शिकलेला ऋषिकेश पुढे आरएलएस कॉलेजमधून बारावी झाला. इंजिनीयर किंवा डॉक्टर असा विचार त्याच्या मित्रांनी सुरू केलेला असताना त्याने दिल्लीमध्ये जाऊन प्रशिक्षण क्लासेस सुरू केले आणि अमेरिकेत पायलट प्रशिक्षणासाठी निवडला गेला. 11 जुलै 2009 रोजी त्याचे स्वप्न पूर्ण झाले तो फक्त 21 वर्षांचा होता. त्याला पायलट होण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र देण्यात आले.
वेगवेगळी प्रमाणपत्र मिळाली, परवाने मिळाले, पण नोकरीची संधी मिळण्याच्या बाबतीत त्याला अडथळे आले, समस्या होत होती. त्याच काळात वेगवेगळ्या आव्हानातून जात असताना त्याला स्टार एयर कंपनीचे संजय घोडावत भेटले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज स्टारचा अधिकृत पायलट तो झाला आहे.
ऋषिकेश ला आणि त्याच्या पालकांना वंदन करतानाच त्याच्या कर्तृत्वाचा आदर्श तरुणांनी घ्यावा हीच गरज आहे.