गोगटे सर्कल येथील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाबद्दल संशय निर्माण झाल्यानंतर तसेच पंधरा दिवसातच रेल्वेब्रिजच्या भिंतींना तडे गेल्यानंतर आता खासदार अंगडी जागे झाले आहेत त्यांनी ट्विट करून बेळगावच्या प्रोफेशनल फोरम मध्ये असलेल्या अभियंत्यांना या ब्रिजच्या एकंदर कामाची पाहणी करावी व त्याचा अहवाल द्यावा आपण दोषींवर कारवाई करू अशी भाषा सुरू केली आहे. मात्र अंगडींनीच घाई केल्यामुळे लवकरात लवकर ब्रिजचे काम पूर्ण करावे लागले अन्यथा ते वेळेत पूर्ण झाले असते तर समस्या निर्माण झाल्या नसत्या यासाठी घिसाडघाई करण्यावर भर दिलेले अंगडीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे .
रेल्वे ब्रिज पूर्ण करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता .मात्र शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना उद्घाटन करून श्रेय घेण्याची घाई लागलेल्या अंगडीनी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी पुढील लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्घाटन करण्याची घाई केली .यासाठी कंत्राटदारावर दबाव आणून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आटापिटा सुरू केला होता. यामुळे ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्याला पूर्णपणे तेच जबाबदार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाप्रमुख सुरेंद्र शिवाजी अनगोळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सध्या खासदार अंगडी कंत्राटदार व रेल्वे अभियंता विभागावर दोष देत आहेत पण घाई करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळेच या चुका झाल्या असून सर्वप्रथम त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे खासदार अंगडी यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .एका स्थानिक वर्तमान पत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत कंत्राटदाराने आमच्यावर गडबडीत काम करण्यासाठी दबाव लोकप्रतिनिधीनी आणला असे म्हटले होते त्याला याकामी विद्यमान खासदार देखील जबाबदार आहेत अशी देखील यानिमित्ताने चर्चा होत आहे.
जानेवारीनंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होईल त्यानंतर आचारसंहिता घोषित होऊ शकते त्यामुळे उदघाटन करण्याचे श्रेय दुसरे कोणीतरी घेईल तेव्हा उद्घाटना अभावीच ब्रिज सुरू केला जाईल या भीतीतून अंगडी यांनी काम पूर्ण करण्याची घाई केली .काम लवकरात लवकर पूर्ण करायला लावले यामुळे ज्या काही चुका होतील त्याला पूर्णपणे जबाबदार तेच राहतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.