नव्यानेच विमान वाहतूक क्षेत्रात दाखल झालेल्या स्टार एअर या विमानसेवेने बेळगाव ते बंगळूर ही आपली विमानसेवा २५ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे.
यापूर्वी ही विमानसेवा ६ फेब्रुवारी पासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र आता स्टार चे विमान २५ नंतर आठवड्यातील सहा दिवस बेंगळूरसाठी सेवा देणार आहे. फक्त मंगळवार वगळता इतर दिवशी ही सेवा सुरू असणार आहे.
६ फेब्रुवारी पासून बुकिंग सुरू करण्यात आलेले असताना आता ही तिकितेसुद्धा रद्द करण्यात आली आहेत. ही सेवा पुढे ढकलण्यास उशीर का झाला याचे प्रत्यक्ष कारण समजू शकलेले नाही पण केंद्रीय खात्यांकडून तांत्रिक गोष्टींची पूर्तता न झाल्याने हा उशीर झाला असण्याची शक्यता आहे.
मंगळवार वगळता दररोज दुपारी १.२५ वाजता हे विमान बेंगळूरहून निघून दुपारी २.३० वाजता बेळगावला पोहोचणार आहे. तर दुपारी तीन वाजता बेळगावहून निघून ते ४.०५ वाजता बंगळूरला जाणार आहे.