सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्या संदर्भात महाराष्ट्र सामर्थ्याने पाठपुरावा करेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार सोमवार दिनांक 14 रोजी रात्री शरद पवार व फडणवीस यांची समिती नेत्यांसोबत बैठक झाली. मंगळवार दिनांक 15 रोजी दुपारी तीन वाजता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी समिती नेत्यांना बोलावून घेतले होते.
दावा चालवण्यात निर्माण झालेल्या समस्या, वकिलांच्या काही अडचणी याबाबत विविध पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व सामर्थ्याने महाराष्ट्र शासनाने दाव्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच गरज भासेल त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्लीस्थित वकिलांशी समन्वय करण्याची सूचनाही त्यांनी केली. सीमाप्रश्नाचे वकील हरीश साळवे व अडवोकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांच्याशी चर्चा करून वेळीच सीमा प्रश्नाला बळकटी देण्याची ग्वाही शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच लवकरात लवकर उच्चाधिकार समितीची व तज्ञ समितीची बैठक अधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
याचबरोबरीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याशी सोमवारी रात्री समिती नेत्यांनी चर्चा केली असून संजय राऊत यांनी आपण नेहमीच या खटल्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन देऊन या संदर्भात कधीही आपल्याशी चर्चा करा आपण उपलब्ध आहोत असे आश्वासन दिले आहे.