प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही बेळगावच्या प्रवेशद्वाराला असलेल्या राष्ट्रपित्याला दुर्लक्षितच ठेवण्यात आले. यामुळे शेवटी निवृत्त नागरिकाला या पुतळ्यास हार घालून अभिवादन करावे लागले. प्रशासकीय अधिकारी प्रजासत्ताक दिनी आपल्या गाड्यांनाही फुलांचे हार घालत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त करून ज्यांनी दुर्लक्ष केले त्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आज सकाळी 8 ते 11.30 पर्यंत वाट बघून शेवटी 11.30 वाजता नागरिकांनाच अभिवादन करावे लागले. कुणीतरी येतील आणि अभिवादन करतील अशी अपेक्षा होती पण कोणीही आले नाही.
विजय लक्ष्मण चव्हाण असे त्या गांधीजींना अभिवादन केलेल्या नागरिकांचे नाव आहे. ते सह्याद्री नगर चे रहिवासी असून लष्करात कार्यकारी अभियंते या पदावर काम करत होते.
हार आणि फुले अर्पण करून त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. मागील दोन ते तीन वर्षांपासून या पुतळ्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. असे अपमान करायचे असल्यास हे लोक राष्ट्र पुरुषांचे पुतळे बसवतात कशासाठी असा प्रश्न त्यांनी बेळगाव live कडे बोलताना केला.
रेसकोर्स आणि लष्करी भागात हा पुतळा असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो . जसे नागरिक पोलीस स्थानकाच्या हद्दीत अडकतात तसेच महात्मा गांधी सुद्धा अडकले आहेत. यामुळे आता ते कुणाच्या हद्दीत हे पहिल्यांदा शोधून त्यांचे पूजन आणि अभिवादन कोण करणार हे ठरवावे लागणार आहे. मात्र या दुर्लक्ष करणाऱ्यांबद्दल काय कारवाई करणार हे सुद्धा महत्वाचे आहे.