दगडाने ठेचून दोघा मित्रांचा निर्घृण खून केल्याची घटना तालुका बेळगाव येथे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. बसनगौडा सोमरेड्डी पाटील (वय 25) व पत्र्याप्पा मल्लाप्पा मल्लनावर (30, दोघेही रा. मारिहाळ) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेजण शनिवारी रात्री ट्रॅक्टर घेऊन एकाच्या शेतात नांगरण्यासाठी गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी दोघांचे शेतात पडलेले मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली.हे दोघे मित्र असून ते मूळचे बदामी जिल्ह्यातील आहेत. गेल्या ४५ वर्षांपासून या दोघांचे पालक मारिहाळ येथे येऊन वास्तव्य करतात. शनिवारी रात्री हे दोघेजण मारिहाळपासून एक किलोमीटर आत असलेल्या विठ्ठल मल्हारी यांच्या शेतात नांगरण्यासाठी गेले होते. परंतु ते घरी परतले नाहीत. रविवारी सकाळी शेजारच्या शेतमालकाने ही घटना पाहिली व त्यांनी मारिहाळ पोलिसांना कळविले.
घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, डीसीपी सीमा लाटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा खून कोणी व कशासाठी केला? हे अद्याप समजू शकले नाही.