भारत चीन युद्धात लढलेले निवृत्त कर्नल प्रकाश मिठारे आणि देशाचे पोशिंदें शेतकरी प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकरी सदाशिव मायांनाचे (कडोली) आणि बाळू धनगावडे(निलजी) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिलांना प्राधान्य देत निलिमा पावशे आणि वसुधा म्हाळोजी यांच्या शुभहस्ते बेळगाव तालुक्याचे स्वप्न असलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपने सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. उशीर झाला पण माघार नाही असे म्हणत कारखान्याचा श्रीगणेशा करण्याचे ध्येय पूर्ण करण्यात येणार असून त्याची पायाभरणी आज करण्यात आली.
अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी यावेळी बोलताना भागधारक आणि शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.येत्या १५ दिवसात म्हणजेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कारखान्याचे कामकाज सुरू करण्यात येईल तशी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. असेही त्यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या बैठकीत कारखान्यासाठी ऊस कुठून घ्यायचा तसेच कसा जमा करायचा याबद्दल चर्चा करण्यात आली.यावर्षी जास्तीत जास्त ऊस मिळवून होता होईल तितके गाळप करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील, संचालक मनोहर हुक्केरीकर, भाऊराव पाटील,अनिल कूटरे, भरत शानभाग,मनोहर होनगेकर,परशराम कोलकार,सुमित पिंगट,माजी संचालक मनोज पावशे व इतर मान्यवर, भागधारक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.