बेळगाव डायॉसिस शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभ या वर्षी साजरा करण्यात आला असून या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता 15 जानेवारी रोजी सेंट झेवियर्स हायस्कूल च्या मैदानावर मोठ्या समारंभाने होणार आहे .आर्चबिशप पीटर मचाडो आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवात समारंभाला मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली होती .वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. आता या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता करून शिक्षण मंडळ एकावन्न व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 1969 मध्ये या शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली असून आज पर्यंत गरजू गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. बेळगाव डायॉसिसच्या शिक्षण मंडळाच्या अंतर्गत 107 शैक्षणिक संस्था काम करत असून 1969 मध्ये तेव्हाचे बिशप आग्नेशियास लोगो यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली आहे.
जात पात धर्म याची बंधने न पाळता शिक्षण देण्याचे काम केले जाते या शिक्षण मंडळावर फादर रॉबर्ट फर्नांडिस यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विस्ताराचे काम केले असून मुंबई कर्नाटक विभागांमध्ये त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना जन्म दिला. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शाळांना सुधारण्याचे काम करून तेथील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतरचे बिशप बरनार्ड मोरस आणि पीटर मचाडो यांनी सुद्धा शिक्षण मंडळाचे काम उल्लेखनीय होण्यासाठी चांगली जबाबदारी निभावली आहे. सध्या सेक्रेटरी पदावर असलेले फादर अल्विन सुधीर हे मागील नऊ वर्षांपासून या शैक्षणिक मंडळात काम करत आहेत.
बेळगाव धारवाड बागलकोट गदग हावेरी आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था विखुरल्या असून 45 हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे या शिक्षण संस्थांमध्ये 2000 शिक्षक काम करत आहेत.
शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेऊन पुढे पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला आहे. इन्फोसिसचे प्रमुख असलेले नंदन निलेकणी, आय ए एस अधिकारी विषाल, माजी मंत्री बसवराज होरट्टी, दहावीत राज्यात पहिला नंबर घेऊन उत्तीर्ण झालेला महमद कैफ मुल्ला अशा अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेचे नाव उज्वल केले.