आजची राशी सिंह (lio)
||सुखाकडे वाटचाल||
सिंह राशि कालपुरुषाच्या कुंडलीतील पाचवी राशी होय. पूर्व दिशेला ही राशी बलवान असते या राशीला राज राशी ही म्हटले जाते या राशीचे जातक महत्त्वाकांक्षी उच्चअभिलाशी उदारमतवादी दिसायला आकर्षक रुंद खांद्यांचे तेजस्वी तसेच साहसी व बलशाली असतात .हे लोक पराक्रमी व निर्भय असतात. कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची धम्मक असते. आत्मविश्वास भरपूर असतो निर्णय अचुक घेतात. यांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार असते. समाजात मान-सन्मान प्राप्त करतात या राशीच्या स्त्रिया थोड्या पुरुषी बाण्याच्या असतात. कर्तव्यदक्ष असतात कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या पार पडतात. या स्त्रिया चारित्र्यवान शीलवान कष्टाळू तसेच स्वाभिमानी असतात. हे लोक देवावर विश्वास ठेवतात परंतु अंधश्रद्धाळू नसतात.
या राशीच्या व्यक्ती शक्यतो सरकारी क्षेत्र राजकीय क्षेत्र सामाजिक संस्था पोलीस खाते अधिकारीपदावर आढळतात.
या राशीच्या व्यक्तींना शक्यतो हाडाचे ,पाठीचा कणा व त्याचे मज्जातंतू व हाडाच्या मज्जा चे आजार तसेच छातीचे दुखणे जलद श्वासोच्छ्वास व तोल जाणे, ज्वर येणे ,हृदया संबंधी आजार होऊ शकतात.
वर्षाच्या सुरुवातीला आपल्या चतुर्थ स्थानात गुरु येत आहे .हा गुरू वाहनसौख्य देईल. कौटुंबिक बाबतीत मध्यमफल दायी राहील. महत्त्वाच्या कामासंबंधी हा गुरू चांगली फळे देईल. यावर्षी ग्रहाची साथ जरी आपणास मध्यम असले तरी आपण त्यातून मार्ग शोधून पुढे वाटचाल कराल. कारण आपल्या स्वभावात परिस्थितीवर मात करण्याची धमक आहे . सप्तमातला अस्तंगत बुध वैवाहिक सुखात कमतरता आणेल. हा बुध व्यापारी व भागीदारी व्यवसायातील लोकांना काही प्रमाणात नुकसान करेल परंतु याची भरपाई आपण पुढच्या काळात करून घ्याल .
मार्च एप्रिल या काळात कुठल्याही प्रकारचे ऋण काढू नये किंवा पैशाचे उधार-उसनवारी करू नये कारण आपल्या धनेश अष्टमात नीच होत आहे . धनेश अष्टमस्थानी पैशांच्या संदर्भात विनाकारण पैशाचा अपव्यय होणे कर्ज न फिटणे तसेच वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीसंबंधी काळजी करवतो. यावर्षी पंचमातील शनी देखील चतुर्थातील गुरुगृही असला तरी संततीबाबत यावर्षी थोडी चिंता राहील. आपल्या राशीचा बारावा राहू देखील डोळ्याचे त्रास देईल. आर्थिक घडी विस्कटेल. मार्च २३ ला राहू-केतू धनु मध्ये प्रवेश करेल. तेव्हा परिस्थिती चांगला बदल होईल .मागील महिन्यातील ग्रहमानाला मात करणारा राहील. एप्रिल ची सुरुवात शुभकारक ठरेल. लाभतील राहू सौख्य ऐश्वर्य व महत्वकांक्षा पूर्ती करेल. २९ मार्चला त्याला साथ देण्यासाठी गुरू हा धनू राशीत येईल. हा गुरू संततीच्या बाबतीत चांगले फळ देईल .या काळात विवाहितांना संतती सुख लाभेल. यावर्षी सुरुवातीला सिंह राशीच्या तरुण-तरुणींना गुरुबळ नसले तरी धनु मधील गुरु थोड्या काळाकरिता का होईना विवाह योग देईल. नंतर पुन्हा नोव्हेंबर मध्ये योग सुरू होतील.
मे जून ७ मे पर्यंत वृषभेतला मंगळ आपणास चांगला राहील. दशमातला मंगळ कुलदीपक योग करवीतो या काळात आपण धैर्यवान पराक्रम करवितो. लष्कर तसेच पोलिस खात्यात असणाऱ्यांना हा मंगळ भरती व बढतीचे योग देईल. शुक्र ग्रहोतील मंगळ डॉक्टर केमिस्ट किंवा या क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात लाभदायी ठरेल .लाभस्थानातील राहू आर्थिक बाबतीत चांगले फळ देईल. परंतु या काळात मित्रासोबत व्यवहार करताना जपून करावे. राहु मंगळ युती एखाद्याकडून फसवणूक होणार नाही याची खात्री करून घ्यावी. भाग्यातील शुक्र हर्षल युती प्रवास घडवेल. स्त्रियांना काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. या काळात नोकरीत असणाऱ्याना परदेश प्रवास घडेल. या काळात भावंडांचे सौख्य लाभेल.
जुलै ऑगस्ट या काळात जुलै ची सुरुवात तशी चांगलीच राहील व्यापारी लोकांना नोकरदारांना यशाकडे नेणारी राहील. या काळात वयस्कर मंडळींनी तब्येतीची काळजी घ्यावी. वडिलधार्यांशी आपले मतभेद होतील .या काळात स्त्रियांनी कौटुंबिक शांतता टिकवून ठेवणे गरजेचे आहे .विद्यार्थी वर्गाने निर्णय घेताना ठाम राहावे , धरसोड प्रवृत्ती ठेवू नये.
ऑगस्टमध्ये व्ययात असणारा मंगळ बुधाबरोबर आहे हे विसरून चालणार नाही. हे दोन शत्रू ग्रह व्ययस्थानात असून १२ ला बुध अस्तंगत होत आहे. त्याचे वाईट परिणाम दिसतील. त्या काळात व्यापारी अथवा भागीदारी व्यवसायात असणाऱ्यांनी पैशाची गुंतवणूक बरोबर न केल्याने संपत्ती जाण्याचा योग येतो. चोरी होणे, त्यांची जनावरे गुरेढोरे आहेत त्यांना त्याचा वियोग होईल किंवा जनावरांना रोग उत्पन्न होतील. शेतकरीवर्गाने या काळात आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. व्यसनी लोकांनी पैशाची उधळपट्टी करू नये. या काळात वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ८ ऑगस्टला आपल्या राशीत मंगळ येत आहे. सप्टेंबरला आपल्या राशीत चार ग्रहांचे वास्तव्य होत आहे. त्यामुळे या दोन महिन्यात आपणास उत्तम ग्रहाची साथ लागेल. मंगळ आपल्या उत्साहात वाढ करेल. कामाचा उरक वाढेल .स्वबळावर काही करून दाखवण्याची संधी प्राप्त होईल. बुधाला लग्नात दिगबळ प्राप्त होते त्यामुळे वाचन लेखन करणाऱ्यांना हा काळ उत्तम राहील .उच्ची रवि शुक्र मन प्रसन्न ठेवेल. चैनीवर योग्य खर्च होईल .आपल्या प्रेमळ वागण्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. महिलांना या काळात गृहसौख्य लाभेल. प्रेमात पडलेल्यांनी तरुण-तरुणींनी या काळात समोरच्या व्यक्तीची खात्री करून निर्णय घ्यावे. शुक्र-मंगळ युती नेपच्यूनच्या प्रतीयोगामुळे आपली फसवणूक करू शकते. नोकरदारांना हा काळ अति उत्तम राहील. वरिष्ठांकडून कौतुक होईल .
नोव्हेंबरची सुरुवात बंधूंची चिंता निर्माण करेल. पण चतुर्थात येणारा शुक्र वास्तूसंबंधीची कामे मार्गी लावेल. अधिकारात वाढ वाहन सौख्य देईल. दूरच्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. एखादी चांगली बातमी कानी पडेल .व्यापारी लोकांना काळ उत्तम राहील. चार तारखेला राशीच्या पंचमात येणारा गुरू याला सहाय्यक ठरेल .व्यापारी लोकांना काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास काळ उत्तम राहील. डिसेंबर महिना पंचमात गुरू शुक्र शनी केतू आणि प्लूटो या पाच ग्रहांचे वास्तव्य राहील. विद्यार्थी वर्गाला मानसन्मान मिळेल. आपल्या पराक्रमात वाढ होईल. एखाद्या कामात मित्रांकडून मदत मिळेल. राशीपासून तिसरा मंगळ पराक्रमात ला मंगळ धैर्य, जय देईल. स्त्रियांना सुवर्णालंकार प्राप्त होतील. नोकरीत असणाऱ्याना बढती बदलीचे योग येतील
काही महत्वाचे
सिंह राशीतील नक्षत्र :मघा, पूर्वा, उत्तरा
मघा नक्षत्र स्वभाव :धार्मिक, नीतिमान (मा, मी, मू, ते)
पूर्वा नक्षत्र स्वभाव: विलासी, ऐश्वर्यवान (मो, हा, टी,टे)
उत्तरा नक्षत्र स्वभाव :मितभाषी, कलाप्रेमी (ट)
उपासना
# मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी गूळ, मीठ दान करावे. तसेच पीतरांची सेवा करावी. कावळ्यांना जेवण, मुंग्यांना साखर घालावी. पितृतुष्टी वाचावी
# पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी शिजलेले अन्न, दहीभात दान करावे. पळसाची पूजा करावी.सुर्यष्टक स्तोत्र वाचावे
#उत्तरा नक्षत्राच्या श्वेत वस्तू, मोती दान करावे गायीला गूळ दान करावे.दत्त बावन्न वाचावी
# भाग्यरत्न राशीप्रमाणे माणिक
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : रविवार,सोमवार, गुरुवार
# शुभमहिने : एप्रिल, मे, ऑक्टोबर, डिसेंबर
#रंग : सोनेरी,गुलाबी
( भाग्योदय वयाच्या १९ ते ३७ या काळात होईल)