आजची राशी ” कर्क”
(राशीस्वामी- चंद्र)
|| ग्रहांची साथ लाभेल ||
राशी वैशिष्ट्ये
कर्क ही कालपुरुष कुंडलीतील चतुर्थ क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. ही चर राशी व स्त्री राशी असून जलतत्वाची रास आहे. यामुळे साहजिकच या राशीच्या व्यक्तीमध्ये हळवेपणा दिसून येतो . चंद्रासारख्या कोमल हृदयाच्या पण चंचल स्वभावाच्या प्रेमळ व्यक्ती या राशीत आपल्याला दिसून येतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
या राशीच्या स्त्रिया संसार उत्तमप्रकारे करतात. म्हणजेच गृहकर्त्यव्यदक्ष धार्मिक आणि विविध काळातून असणाऱ्या असतात. यांना स्वयंपाकाची विशेष आवड दिसून येते. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उत्तम प्रकारे करतात, त्यातच त्यांना आनंद मिळतो.
या राशीचे पुरुषही दयाळू अंतकरणाचे असतात. परंतु हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. एकाधी गोष्ट ठरवली की ती करूनच गप्प बसतात. या राशीच्या स्त्रिया एक उत्तम गृहिणी म्हणून ओळखल्या जातात. या स्त्रिया दिसण्यास आकर्षक असतात.
या राशीचे लोक विशेष करून पांढऱ्या वस्तूचा व्यापार, पातळ पदार्थ, गृहोपयोगी वस्तूंचा व्यापार, किंवा कंपन्या, चांदी, दुधाचे पदार्थ,फळे, भाज्या, आयुर्वेद, मानसरोग, हॉटेल व्यवसाय यासारख्या क्षेत्रात नोकरी धंद्यात असतात.
या लोकांना विशेष करून अपचन, पित्त, निद्रानाश, कंबर तसेच मणक्या संबंधी आजार होतात.
येणारे नवीन वर्षात ग्रहांची साथ कर्क जातकाला उत्तम प्रकारे लाभत आहे. यावर्षी आपल्या राशीपासून पंचमात गुरू, षष्ठात शनी येत असल्याने या दोन बलवान ग्रहांची साथ वर्षभर आपल्याला लाभणार आहे.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पंचमात येणारा गुरू विद्यार्थी वर्गाला शिक्षणक्षेत्रात उत्तम प्रकारे मदत करेल. या राशीत असणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. शिक्षण किंव्हा नोकरीसाठी परदेशगमन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना मात्र काही प्रमाणात विलंब होऊ शकतो. कारण मिनेत भाग्यातील मंगळ प्रवास अडचणी निर्माण करणारा आहे. व्यापारी वर्गाला महत्वाच्या देवघेवीत विलंब जाणवेल.
मार्च व एप्रिल महिन्यात अष्टमस्त रवी नेपच्यून युती चिडखोरपणात वाढ करील. वयस्कर मंडळींनी या महिन्यात प्रकृतीची काळजी घ्यावी. लहान मुलांना देखील याकाळात संभळावे. एकाद्या रोगाची लागण होणे स्वरपीडा, उष्णतेचे विकार जाणवतील. याकाळात आपल्या षष्ठात असणारा शनी कोर्टकचेरी संबंधी प्रकरणे मार्गी लावील. तसेच शत्रूवर विजय मिळवून देईल. याकाळात तरुण तरुणींचे विवाह जमाण्याचे योग येतील. राशीच्या सप्तमात शुक्र व पंचमात गुरू असल्याने विवाह संबंधी चंचल योग आहे. सप्तमातला केतू प्रवास योग देईल. स्त्रियांना कुटुंबासोबत पर्यटनस्थळी फिरण्याचा आनंद मिळेल.
मे व जुन महिना व्यापारी वर्गाला थोडा त्रासाचा राहील. याकाळात आपल्या राशीच्या बाराव्या स्थानात येणार राहू मंगळ धनाचा नाश करणारा आहे. कर्जबाजारी करणारा आहे. याकाळात उद्धार उसनवारी करू नये. नोकरीत असणाऱ्यांना गंडांतर येऊ शकते. परंतु अध्यात्मिक क्षेत्रात असणाऱ्यांना अध्यात्मिक शक्तीत वाढ होईल. धार्मिक कार्यासाठी दूरचे प्रवास होतील. डोळ्यासंबंधी विकार होतील. विनाकारण खर्च वाढतील. हे दोन्ही महिने कुठलाही आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावा. कागदपत्र तपासून व्यवहार करावेत. लाभतील रवी मित्रांकडून लाभ देणारा राहील. मित्र मैत्रिणींचे सौख्य देणारा राहील.तसेच ज्यांना संतती नाही अशांना संततीचे योग येतील.
जुलै ऑगस्ट या काळात कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक राहील. व्यापारी वर्गास हा काळ उत्तम धन प्राप्ती करणारा राहील. स्त्रियांना मौल्यवान दागिने व कपडे यांचा लाभ होईल. याकाळात तरुण तरुणी चैनीच्या वस्तूवर पैसे खर्च करतील. कुटुंबात एकाधे मंगलकार्य ठरेल. अविवाहितांचे विवाह जमतील. २१ जुलै ते ७ सप्टेंबर शुक्र अस्तंगत होत असल्याने आपले खिशावरील नियंत्रण सुटेल. १६ जुलैला होणारे ग्रहण आपल्या राशीला शुभफलदायी असणार आहे. त्यामुळे आपणास चिंता करण्याचे कारण नाही. जून अखेर आपल्या राशीत येणार मंगळ १६ जुलै ते १२ ऑक्टोबर पर्यंत अस्तंगत राहणार आहे. छातीसंबंधी तसेच डोक्यासंबंधी विकार जाणवतील. याकाळात प्रकृतीची विशेष काळजी घेणे जरुरी आहे. अस्तंगत पापग्रह विशेष चांगली फळे देत नाही.
सप्टेंबर ते ऑक्टोबर याकाळात ग्रह मिश्रफल देतील. बुध शुक्र यांची युती आपल्या लाभस्थानात आहे. तर द्वितीयात रवी मंगळ सिंहेचे येत आहे. यामुळे सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना बढतीचे योग येतील. वरिष्ठांकडून मानसन्मान मिळेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. शेजारी व बंधू भगिनींच्या सौख्याच्या दृष्टीने लाभदायी काळ राहील. मित्र मैत्रिणीकडून आर्थिक लाभ होतील. भागीदारी व्यावसायिकांना देखील यश लाभेल. रवी, मंगळ युती सरकारी कामात यशदायी असली तरी एकाद्या कडून फसवणूक घडवू शकते. पैशाच्या बाबतीत द्वितीयात मंगळ अशुभ परिणाम देतो. गुंतवणूक दारांनी नवीन बँका किंव्हा गुंतवणुकीच्या इतर क्षेत्रात गुंतवणूक करताना खरेखोटेपणा तपासून गुंतवणूक करावी. कोणत्याही लोभास बळी पडू नये.
नोव्हेंबर डिसेंबर अखेर षष्ठातील गुरू प्रकृती चांगली ठेवेल. पराक्रमात केतू वाढ करेल. षष्ठातील ग्रहांचे पूर्णपणे बळ लाभेल. परंतु गृह सौख्याच्या दृष्टीने राशीच्या चतुर्थातील मंगळ त्रासदायक असून तो गृहकलह निर्माण करू शकतो. कौटुंबिक त्रास जाणवतील. मित्रांकडून अपमानास्पद वागणूक मिळू शकते. प्रॉपर्टीचे वाद निर्माण होतील. डिसेंबर मध्ये पंचमात येणाऱ्या मंगळ मूळे स्त्रियांना मासिक धर्माचे त्रास होऊ शकतात. गरोदर स्त्रियांनी याकाळात प्रकृतीची काळजी घ्यावी. भाग्येश षष्ठात वर्षभर असल्याने मामा, मावशी यांच्याकडून काही लाभ होऊ शकतील. या वर्षात कर्क राशी वाल्यांना बऱ्यापैकी ग्रहांची साथ लाभेल. व्यापार, नोकरी व स्वास्थ्याच्या दृष्टीने हे वर्ष आपणास समाधान देणारे राहील. काही ग्रहयोग वगळता वर्ष यशदायी ठरेल.
काही महत्वाचे
# कर्क राशीतील नक्षत्रे: पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा
# पुनर्वसू स्वभाव : सरळ, सौम्य नाम अक्षर :ही
# पुष्य स्वभाव :धनाढ्य, बुद्धिमान नाम अक्षर : हु, हे, हो, हा
# आश्लेषा स्वभाव : क्रोधी, बहुभाषि: डी, डु, डे, डा
उपासना
# पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी वेळूची पूजा करावी तीळ दान करावे. तसेच शंकराची सेवा करावी. शिवलीलामृताचे, ११ व्या अध्यायाचे पठण करावे.
# पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी पिंपळ वृक्षाचे पूजन करावे, लाल वस्त्र दान करावे.दत्ताची सेवा करावी व दत्त बावन्नी वाचावी
#आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी मूग दान करावे तसेच विष्णुपूजा करावी.व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा
* महिलांनी दुर्गास्तोत्र पठण करावे.
* विध्यार्थीवर्गाने सरस्वती मंत्राचा जप करावा, विध्येत यश मिळेल.
* वयस्कर व्यक्तींनी दत्ताय साक्षात्काराय नमः जप करावा.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे मोती
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : सोमवार, मंगळवार, गुरुवार
# शुभमहिने : एप्रिल, मे, ऑक्टोबर, डिसेंबर
#रंग : पोपटी, केशरी
( भाग्योदय वयाच्या २५ ते ३७ या काळात होईल)
Yes