भारतीय जनता पार्टी ने कर्नाटकात लोकसभा निवडणुकीत १४ नव्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदारसंघातही नवीन उमेदवार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंगडींचा पत्ता कापला जाऊन भाजप नवीन उमेदवाराच्या शोधात आहे असे वातावरण सध्या आहे.
भाजपचे कर्नाटक प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा याच कामासाठी काल बेळगावला आले होते. येथे येऊन त्यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडी बद्दल ही बैठक महत्वाची ठरल्याची माहिती मिळाली आहे.
भले ही येडीयुरप्पा यांनी उमेदवार बदला बद्दल वक्तव्य केले नसले तरी केंद्रीय नेतृत्व मात्र बेळगाव बाबत बदल करण्याच्या विचारात आहेत. उमेदवार बदली करायचे झाल्यास भाजपकडून सीमा भागातील मराठी भाषकांची मते कोण घेऊ शकतो याबद्दल चाचपणी सुरू आहे.ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील,किसान मोर्चाचे शंकरगौडा पाटील,बैलहोंगल विश्वनाथ पाटील यांच्या नावांचा विचार सुरू आहे. त्यातल्या त्यात माजी आमदार संजय पाटील यांचा जनसंपर्क मराठी भाषिकात असलेलं स्थान पाहून संजय पाटील यांचा विचार केंद्रीय नेतृत्व गंभीरपणे करत आहे.
भाजपला पाच राज्यात मिळालेला पराभव हा कुचकामी आणि निष्क्रिय उमेदवारामुळेच झाल्याचे भाजप पक्ष नेतृत्वाला लक्षात आले आहे. यामुळे आता नवीन चेहऱ्यांना स्थान देण्याचा विचार सुरू झाला आहे. या निमित्ताने बेळगाव चिकोडी लोकसभा मतदारसंघात जैन उमेदवाराला स्थान देण्याचा विचार सुरू झाला आहे.
काँग्रेस पक्षाने बेळगाव लोकसभेसाठी मराठा कार्ड बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . तेंव्हा मराठी आणि कन्नड भाषिक अश्या सर्व मतदारांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकणारा उमेदवार असावा अशी चर्चा झाली आहे.भाजपचे बेळगावचे खासदार सुरेश अंगडी हे पुन्हा उमेदवार झाल्यास काँग्रेसचा विजय नक्की आहे हे एडीयुराप्पा यांनाही पटलेले असल्याने आता हा सर्व्हे सुरू असून यात माजी आमदार संजय पाटील बाजी मारून जाणार असे भाजप च्या गोटात बोलले जात आहे.