बनावट कंपन्या काढून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याची प्रकरणे रोज घडत आहेत. अशाच एक प्रकरणात आता जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना ठकवल्यात आल्याचा आरोप करून गुंतवणूकदारांनी ऐहोळे यांच्यासह त्यांचे पती प्रशांत यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून जिल्हा पंचायत कार्यालयासमोर ऐहोळे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली पण त्यांनी दाद घेतली नाही आता गुंतवणूकदार भडकले असून त्यांनी या फसवणुकीची तक्रार जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिली आहे.
महालक्ष्मी मल्टिपर्पज को ऑप प्रायवेट लिमिटेड या कंपनीने ही फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या कंपनीचे प्रमुख हे एन प्रशांतराव हे असून त्यांची पत्नी आशा ऐहोळे या उपाध्यक्ष आहेत. आशा ऐहोळे या जिल्हा पंचायत अध्यक्ष असून त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत तसेच आपले इचलकरंजी येथील कार्यालय सुद्धा बंद करण्यात आले आहे असे आरोप करण्यात आले आहेत.
सर्व गुंतवणूकदार हे शेतकरी व शेतमजूर आहेत. घामाची कमाई त्यांनी या कंपनीत भरली आहे. कमी मुदतीत पैसे दुप्पट करून देतो असे त्यांना सांगण्यात आले होते पण मुदत संपली तरी पैसे दिले जात नाहीत तसेच कंपनीने दिलेले चेक कुठलीच बँक स्वीकारत नाहीत अशी त्यांची अडचण होऊन बसली आहे.
हे प्रकरण आणि त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याने चर्चा जोरात असून जिल्हा पंचायत अध्यक्षा अडचणीच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत.
आनंद अप्पूगोळ यांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणानंतर आता हे सुद्धा त्यासारखेच मोठे आर्थिक लुटीचे प्रकरण असल्याची चर्चा सुरू आहे.