बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कागणिकर यांना कर्नाटक राज्य सरकारने देवराज अर्स पुरस्कार दिला आहे. पाच लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बंगळूर येथील विधानसौध येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. कागणिकर हे कट्टणभावी येथील असून आपल्या जण जागरण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत.
रात्रीच्या शाळा तसेच पाणी आडवा जिरवा योजनेची जागृती करून आशिक्षितांना शिक्षण व नापीक जमिनीत पीक उगवण्याचे काम ते करत आहेत.
बेळगावातच नव्हे तर संपूर्ण सीमाभागात ज्यांचे नाव आदराने घ्यावे, असे व्यक्तीमत्व म्हणजे शिवाजी कागणीकर. पर्यावरण, समाजकारण, रोजगार, वंचितांना न्याय मिळवून देणे, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याचे काम या माणसाने केले आहे. म्हणून ते बेळगाव live नेही त्यांच्या कार्याचा यापूर्वी गौरव केला आहे.
पदवी शिक्षण घेऊन अंगात खादीचे शर्ट आणि खादीचीच हाफ पँट, डोकीवर गांधी टोपी असा त्यांचा पोशाख. सर्वोदयी चळवळीचे बाळकडू मिळालेले शिवाजी कागणीकर यांचे आयुष्य म्हणजे समाजाप्रती अर्पण केलेली आहुतीच. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्श गावासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व म्हणजे शिवाजी कागणीकर. अशा या दीपस्तंभरूपी आदर्शाचा अल्प परिचय असा…
शिवाजी कागणीकर १९७२ पासुन विविध ग्रामीण विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी जवळजवळ ५०० शेतकऱ्यांना
गोबर गॅस उभारण्यास मदत केली आहे. कट्टणभावी गावात आणि आसपासच्या भागात पाणलोट उपक्रम सुरू केले
आहेत. या सामाजिक कार्यकर्त्याने १२ वर्षांपर्यंत पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा प्रकल्प राबविला. त्यातून कट्टणभावी परिसरातील शेकडो विहिरींचे पुनरूज्जीवन झाले.
शिवाजी कागणीकर यांनी चार गावांमध्ये २ लाख ५० हजार रोपांची लागवड केली असून त्यांचे नेमकेपणाने जतनही केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ग्रामीण स्त्रियांसाठी १० बचत गटांची स्थापना करण्यात मदत केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कागणीकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन येत असतात. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत बिघडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक निसर्ग शिक्षण आणि जैविक बागकाम उपक्रम राबविले आहेत.
माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना लागू झाल्यानंतर या कायद्यांची योग्य प्रकारे माहिती लोकांपर्यंत पोचविण्यात कागणीकर यांचा वाटा मोठा आहे. रोजगार हमी योजनेतील कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी ते सातत्याने काम करताना दिसतात. याशिवाय भ्रष्टाचारविरोधातील लढाईतहे नेहमी अग्रेसर असतात. अशा या माणसाला अनेक नामवंत संस्थांकडून पुरस्कार मिळाले असून आजही ते त्याच तडफेने काम करताना दिसतात. आपल्या कार्याने या क्षेत्रातील शिवाजी द रियल हिरो असेच आहेत अश्या या व्यक्तिमत्वास त्यांच्या पुढील कार्यास बेळगाव live कडून शुभेच्छा ….