खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांना संसदीय कामकाज सचिव पद बहाल करण्यात आले आहे. गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या कृपेनेच हे पद मिळाले असून ताईंना परमेश्वर पावल्याची चर्चा जोरात आहे.
जी परमेश्वर आणि सतीश जारकीहोळी यांचा अंजलीताई यांना पद मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. वास्तविक पाहता पहिल्यांदा आमदार झालेल्यांना हे पद दिले जात नाही. मात्र भरगोस पाठींबा असल्याने त्यांनी हे पद मिळवू शकल्या असून मंत्री पदाप्रमाणेच सरकारी गाडी व इतर प्रोटोकॉल त्यांना मिळू शकणार आहेत. खानापूरच्या आमदार असलेल्या अंजलीताई आता लाल दिव्याच्या गाडीतून फिरू शकणार असून त्यांच्या जबाबदारीतही मोठी वाढ झाली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निवडी मध्ये सूचक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. पहिल्या कोट्यात यासारख्या महत्वाच्या पदावर लक्ष्मी हेब्बाळकर यांची वर्णी लागायला हवी होती. पण त्या वादात अडकल्याने तसेच जारकीहोळीची त्यांना साथ नसल्याने व अंजलीताई कामाच्या बाबतीत सरस ठरल्याने लक्ष्मी आक्का बाजूला फेकल्या गेल्या आहेत.
प्रभावी व्यक्तिमत्व, व्यवसायाने एमबीबीएस एमडी, मराठा समाजातील महिला तसेच महाराष्ट्र काँग्रेस मधील नेत्यांशी असलेले नातेसंबंध या गोष्टी आहेत शिवाय पती हेमंत निंबाळकर हे आय पी एस अधिकारी असून त्यांचाही दबदबा त्यांना उपयुक्त ठरल्याची चर्चा आहे.
अंजलीताई यांना हे संसदीय समितीच पद मिळाल्याने त्यांच्या कडून खानापूरच्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून त्यानी मतदार संघात राहून अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.