बनावट नोटा छापून खपविणाऱ्या आणि मूळ चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयीताना बेळगाव पोलिसांनी पकडले आहे.
त्यांच्याकडून १ कोटी ८१ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आसीफ शेख (रा. वडगाव) आणि रफीक देसाई (रा. श्रीनगर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
सोमवारी रात्री श्रीनगरनजिकच्या चन्नम्मा सोसायटीजवळ छापा टाकून दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
आसीफ नामक तरुण बनावट नोटा एका व्यक्तीला पुरविणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करुन काल रात्री या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
दोन हजार रुपयांचे ५० बंडल तसेच ५०० रुपयांच्या नोटादेखील यावेळी जप्त करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आसिफ हा दुबई मध्ये कामाला होता. तेथे नोटा बनवण्याचे तंत्र त्याने शिकून घेतले होते. बेळगावला येऊन त्याने कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअर चा वापर करून त्याने या नोटा बनवल्या असून त्या मुख्य चलनात आणण्याचा डाव सुरू होता, असे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.
या आरोपीपैकी रफीक देसाई याने सामाजिक कार्याचा बुरखा ओढून हा गोरख धंदा चालविला होता. जिल्हा इस्पितळ आवारात गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करून तो अन्नदाता म्हणून स्वतःला सादर करीत होता.
याआधी भामटेगिरी आणि फसवणूकीचा आरोप करीत काही महिलांनी रफीकला अर्धनग्न करून त्याची धिंड काढली होती. त्यावेळी त्याने माजी आमदारावर बोट करून आपल्याला बदनाम करण्यासाठीच हेतुपुरस्सर हा डाव रचल्याचा आरोप केला होता.
पोलिसांनी रफिकला बनावट नोटा प्रकरणी अटक केल्याने त्याचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.