१० डिसेंबर रोजी बेळगावला झालेला सीमावासीयांचा महामेळावा आणि महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे भाषण याचा सीमाभागाला फायदा झाला आहे. या महामेळाव्यामुळे नवीन चैतन्य निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्व मराठी बहुल मतदारसंघात झालेला पराभव यामुळे सीमाभागात मरगळ आली होती. नेत्यांनी आपले ते खरे करून प्रत्येक ठिकाणी दोन दोन उमेदवार दिल्यामुळे झालेला पराभव जनतेचे नुकसान करणारा होता. या घटने नंतर युवा समितीने जागे होऊन मुंबईत आवाज उठवला होता.
यानंतर लढा युवकांनी हातात घेऊन आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला असतानाच महामेळाव्यानंतर पुन्हा लढा जागृत झाला असून आता सर्व सीमावासीय पहिल्याच ऊर्जेने लढण्यास सज्ज झाले आहेत.
कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावला घेण्याची सरकारी भूमिका बेळगाव वर हक्क दाखवण्यासाठी आहे मात्र बेळगाव आमचेच आणि आम्ही महाराष्ट्रात जाणारच ही मराठी माणसांची भूमिका कायम आहे हे आता जगजाहीर झाले आहे.
सीमालढा हा फक्त निवडणुकी पुरता मर्यादित नसून रस्त्यावरची लढाई कायम आहे हेच महामेळाव्याने दाखवून दिल्याने काहीही केले तरी मराठी माणसे ऐकत नाहीत हे कर्नाटक सरकारला दिसून आले आहे.