मुंबईत आझाद मैदानावर दाखल होऊन आज सीमावासीय युवक आपली भूमिका महाराष्ट्र सरकारपुढे मांडणार आहेत. शेकडो युवक महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समितीच्या झेंड्याखाली मुंबईत दाखल झाले आहेत. एकदिवसीय उपोषण करून झालाच पाहिजे ची घोषणा आज दिली जाणार आहे.
फक्त पाठीशी राहू नका, कायतरी ठोस कृती करा. सीमाप्रश्न सोडवा आणि आम्हाला आमच्या हक्काच्या महाराष्ट्रात येण्याची संधी द्या. ही एकच मागणी महाराष्ट्र सरकार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे करण्यात येणार आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे असे सांगून हात वर करू नका तर सीमावासीयांचे हात बळकट करा ही मागणी केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते भाई जगताप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंढे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, यशोमती ठाकूर, चंदगड च्या आमदार संध्यादेवी कुपेकर या नेत्यांची भेट घेण्यात आल्यानंतर त्यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन सीमावासीयांच्या पाठीशी राहू असे पाठबळ दिले आहे, यामुळे या लढ्याची धार आणखीनच वाढली आहे.