काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव लोकसभा मतदारसंघात खानापूरच्या विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मराठा उमेदवार देण्याच्या निर्णयातून अंजलीताई यांना खासदारकी लढवण्याची गळ काही वरिष्ठ नेते घालत असल्याची माहिती मिळाली आहे.
टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाने अंजलीताई बेळगाव लोकसभेच्या उमेदवार होऊ शकतात असे वृत्त प्रसारित केले आहे.
माजी मंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मराठा उमेदवार देणार असे पहिल्यांदाच बेळगाव live ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. बेळगावचा खासदार हा मराठी मतांवर निवडून येतो. मराठी माणसाची संख्या जास्त आहे त्यामुळे मराठा उमेदवाराला उमेदवारी देणार असे त्यांनी जाहीर केले होते. त्यांची ही घोषणा खरी ठरणार की काय? अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे.
यापूर्वी बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः सतीश जारकीहोळी किंव्हा विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर सतीश यांना चिकोडी देऊन तिथले खासदार प्रकाश हुक्केरी यांना बेळगावची उमेदवारी द्यायची असाही विचार झाला आहे.
आता अंजलीताईंचे नाव चर्चेत आल्याने काँग्रेस पक्ष यावेळी भाजपचा पाडाव करण्यास सज्ज झाला असल्याचेच वातावरण पाहायला मिळत आहे. मागील वेळी लिंगायत लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव झाला तर पुन्हा लिंगायत कार्ड वापरून चालणार नाही असा विचार काँग्रेस मध्ये सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसने महिला आणि मराठी महिला असे दोन बाण सोडून २००४ पासून लोकसभा सीट घट्ट धरून बसलेल्या भाजप उमेदवाराचा पराभव करण्याची रणनीती सुरू केली आहे.