ऊस दरासाठी आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी आपला मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांवर वळवला आहे. जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहल्ली यांच्या हटावाची मागणी केली आहे.
डीसी हटाव आणि किसान बचाव असा नारा आजपासून शेतकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे फोटो हातात घेऊन शेतकरी निदर्शने करत आहेत.
गुरुवारी दुपारपासून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले आहे. ते आंदोलन रात्रभर सुरू होते. शुक्रवारी सकाळी अर्धनग्न अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकासमोर बसून शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे.
जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी व जिल्हाधिकारी या दोघांचेही निलंबन करावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
एफ आर पी प्रमाणे ऊस दर मिळावा. हा दर न देण्यामध्ये जिल्हाधिकारी राजकीय दबावाखाली येऊन काम करत आहेत. असा देखील आरोप यावेळी करण्यात आला.
गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी पहाटेपासून थंडीचा कडाका वाढत असतानाही शेतकऱ्यांनी थंडीची तमा न बाळगता अर्धनग्न होऊन आंदोलन सुरू केले आहे.
मद्यरात्रीही एक ट्रक व उसाचा ट्रॅक्टर अडवून दगडफेकीचा प्रकार घडला असून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून जिल्हाधिकाऱ्यांवर राजकारणी व साखर सम्राटांच्या दबावाखाली येत असल्याचा आरोपही होत आहे.