महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीचे आंदोलन मुंबईला होणार आहे. या आंदोलनात महत्वाची मागणी असेल ती सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निष्क्रियतेकडे लक्ष द्या ही मागणी. दादांनी सीमाभागाचा समन्वय साधलाच नाही उलट विरोधी वक्तव्ये करून सीमाभागाच्या भावना दुखावल्या. यामुळे सीमाभागाशी नाळ जुळलेल्या व्यक्तीला मंत्री करा अशी सीमाभागातील युवकांची मागणी आहे.
चंद्रकांत दादा यांची नेमणूक झाल्यापासून ते एकदाही बेळगावला आलेले नाहीत. आले ते फक्त विमानतळावर. बऱ्याचदा त्यांनी आपण गडबडीत असून समिती नेते व कार्यकर्ते आले तर भेट देऊ नका असे कर्नाटकी पोलिसांना सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली येथे जाण्यासाठी आले तेंव्हाही त्यांनी असेच केले पण समिती नेते त्यांना भेटल्याशिवाय परतले नाहीत. समन्वयक मंत्र्यांनी रोज होणारे सीमाभागावरील अन्याय जाणून घेण्यासाठी बेळगावला येऊन किमान एक दोन महिन्यातून एकदा बेळगाव व सीमाभागात बैठकी घेणे गरजेचे होते पण दुर्लक्ष झाले आहे.
त्यांची या पदासाठी निवड चुकली ही भावना सीमाभागात आहे. कोल्हापूरचे असले तरी त्यांची नाळ सीमाभागाशी जुळलेली नाही. त्यांना वेदना समजत नाहीत. उलट ते कन्नड गाणी म्हणण्यात पुढे असतात. माणूस कोल्हापूरचाच पाहिजे होता तर राजेश क्षीरसागर होते, सावंतवाडीचे दिपकभाई केसरकर होते. इतर आणखी बरेच होते पण चंद्रकांत दादा यांची निवड फक्त नावापुरातीच झाली हे सीमाभागाचे दुर्दैव मानले जात आहे.युवा समिती याकडे सरकारचे लक्ष वेधणार आहे. सरकारने या पदावरील निष्क्रिय व्यक्तीला सक्रिय करावे किंव्हा सक्रिय व्यक्तीला नेमावे ही मागणी आहे.
सीमाभागासाठी समन्वयक मंत्री नेमा ही शिवसेनेची मागणी होती. शिवसेना खासदार संजयजी राऊत यांनी ही मागणी केली होती. पण नेमणूक करताना नेहमी सीमाभागाच्या पाठीशी राहणाऱ्या शिवसेनेचे आमदार किंव्हा मंत्र्यांचा विचार व्हायला हवा होता. आताही वेळ गेलेली नाही याची जाणीव सरकारला करून दिली जाणार आहे.
29 नोव्हेंबर रोजी युवा समितीचे मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे त्यात आठ
प्रमुख मागण्या आहे समनव्ययक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बेळगावात येऊन दर महिन्याला आढावा बैठक घेऊन समनव्यय साधावा ही मुख्य मागणी आहे.