निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देऊन आमदारपदाची माळ गळ्यात घालून घेतली. मात्र नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापासून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे.यामुळे आक्काला आश्वासनांचा विसर पडला असेच म्हणावे लागेल.
निवडणुकीपूर्वी मार्कंडेय नदीवर जलशुद्धीकरण यंत्र बसवून नदीतील मळीमिश्रीत पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी नागरिकांच्या उपयोगात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुका होऊनही बराच काळ उलटला तरी मार्कंडेय नदीवर यंत्र बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अक्काला याचा विसर पडला आहे का? असा सवाल येथील नागरिकांतुन व्यक्त होत आहे.
मार्कंडेय नदीत शहरातील तसेच काही भागातील हॉस्पिटलमधून सोडण्यात येणारे रासायनिक पाणी मिश्रीत होत असल्याने हजारो एकर जमीन क्षारपड बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. त्याचा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे.
निवडणुकीपूर्वी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नदीवर जलशुद्धीकरण यंत्र बसूवून या नदीतील ड्रेनेज मिश्रीत पाणी शुद्ध करून नागरिकांना या पाण्याचा उपयोग करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अजूनही याकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत लवकरच विचार करून हे यंत्र बसवावे, अशी मागणी होत आहे.