एकीकडे बिबट्याचा शोध घेण्यात वनविभाग अपयशी ठरलेला असताना बेळगाव तालुक्यावर हत्तींचा धोका निर्माण झाला आहे. चंदगड भागातून हत्ती बेळगावकडे येण्याची शक्यता असून आता वनविभागाने अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे.
जांबोटी आणि इतर भागातून हत्ती चारा व पाण्याच्या शोधात चंदगड तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात दाखल होत आहेत. तुडये आणि तिलारी भागातून हत्ती येऊ लागले आहेत.
कुद्रेमनी भागात आलेला बिबट्या शोधण्यात वन खात्याला अपयश आले असून आता हत्तीचे आव्हान निर्माण झाले आहे. हत्ती व बिबट्या महाराष्ट्राच्या हद्दीत असल्याचे सांगून कर्नाटकाचे वन अधिकारी हात वर करत असून आता त्यांनी नागरिकांना धोका निर्माण होण्यापूर्वी कामाला लागायला हवे अशी मागणी होत आहे.
वन्यप्राणी नागरी वस्तीत येऊ नयेत म्हणून योग्य प्रयत्न होण्याची गरज आहे. पूर्वी जगलात चर मारून प्राण्यांना रोखण्यात येत होते. त्यांना पाणी मिळावे यासाठी कृत्रिम तळी स्थापन केली जात होती पण आत्ता हे प्रयत्न कमी पडत असून वन खाते अजूनही झोपेत आहे काय हेच कळत नाही. राज्य सरकारने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची गरज आहे.