बेळगाव पासून १८ ते २० किमी टप्प्यात असलेली तुडये व कुद्रेमनी टप्प्यातील रस्तेमार्ग व गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढत आहे. हा बिबट्या अनेकांच्या नजरेस पडल्याने आणि काल ढेकोळीजवळ शेळीवर हल्ला केल्याने आता दहशत पसरू लागली आहे.
बेळगाव तालुका आणि चंदगड तालुका या दरम्यान येणारा अरण्य भाग खानापूरच्या वन विभागालाही जोडून आहे. अनेक हिंस्त्र प्राणी यापूर्वीही या भागात मिळाले आहेत.खानापूरच्या जांबोटी अरण्य भागात तर वाघ, बिबट्या आणि चित्त्यांनी माणसांवर हल्ले केले आहेत. तुडये व चंदगड भागात हत्तीन्नी धुमाकूळ घातला होता तर विजेचा शॉक लागून हत्ती दगावल्याची घटनाही घडली आहे.
सध्या कुद्रेमनी व ढेकोळी या भागात दिसलेला बिबट्या हा एकच आहे की ते दोन पेक्षा जास्त आहेत? हे समजत नसल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे.
ढेकोळी येथे चरावयास सोडलेल्या शेळीवर काल सायंकाळी ४ वाजता बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. या शेळीचा मालक शट्टूप्पा केदारी बेळगुंदकर यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला असून आता तो सर्व जीवित प्राण्यांसाठी घातक ठरत आहे.