काळा दिन जसा जसा जवळ उलट आहे तसे वातावरण तापत आहे. मराठी मतांवर समितीच्या नावाखाली निवडून आलेल्या नगरसेवकांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी व्हावे हीच सामान्य जनतेच्या मनातील भावना आहे. नगरसेवकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढू नये जनतेच्या या लढ्यात सहभागी व्हावे आणि गटनेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून सर्व नगरसेवकांना घेऊन मूक सायकल फेरीत यावे अशी मागणी होत आहे.
यावेळी महापौर कन्नड भाषिक आहेत, पण मराठी नगरसेवकांची संख्या मोठी आहे. मराठी पुरुष महापौरांनी मागील काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी न होता जनतेची भावना दुखावली होती पण महापौरपदावर असलेल्या मराठी महिलांनी सहभागी होऊन आपला बाणा दाखवून दिला होता.
बरेचसे इतर मराठी नगरसेवक आणि नगरसेविका राष्ट्रीय पक्षांच्या नादाला लागून मराठी अस्मिता गहाण टाकत असल्याचे दिसत आहे. त्यांनी अनेकवेळा काळा दिन चुकवला आहे. का आला नाही असे विचारले की कारवाई होईल किंव्हा मनपा बरखास्त होईल असे कारण सांगितले जाते. पण यंदा एक दोन महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत आणि मनपा बरखास्त झाली तरी काय फरक पडणार नाही तेंव्हा यावेळी कसलीच कारणे न सांगता सर्व नगरसेवकांनी या फेरीत सहभागी होण्याची गरज आहे.
यावेळी तरुण वर्ग जास्त प्रमाणात जागरूक झाला आहे. मराठी मतांवर निवडून येऊन काळ्या दिनी गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना खड्या सारखे बाजूला काढण्याची तयारी युवकांनी सुरू केली आहे तेंव्हा नगरसेवक निष्ठा दाखवणार की काळ्या दिनी आपले तोंड काळे करून आपल्याच पायावर दगड मारून घेणार हे पाहावे लागेल.
नगरसेवकानू निष्ठा पाळा असे आवाहन करण्यात आले आहे आता नगरसेवक काय करतात याकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.