स्वाभिमानी शेतकरी संघटना २७ ऑक्टोबर ला १७ वी ऊस परिषद घेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे होणाऱ्या या परिषदेत देशभरातून लाखो शेतकरी येणार असून कर्नाटकातून २५ हजार ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहतील. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
बेळगाव मध्ये ते पत्रकार परिषदेत ही माहिती देत होते. मागील १६ वर्षे देशातील १९३ शेतकरी संघटनांना सामावून घेऊन ऊस परिषद घेतली जात आहे. साखर कारखान्यांना उसाला चांगला भाव देण्यासाठी ही परिषद काम करत आहे. बेळगाव मधील साखर कारखान्यांना अजून मागील बिल दिले नाही आणि टनाला वाढीव २०० रुपयेही दिले नाहीत हे दुर्दैव आहे असे त्यांनी सांगितले.
रमेश जारकीहोळी सारखे राजकारणी लोकही शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोपही त्यांनी केला. आपण कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष कोडीहळी चंद्रशेखर यांच्याशी बोलणी केली आहेत, बेळगाव मध्ये सुद्धा मोठी परिषद घेऊन येथील कारखान्यांची मनमानी व शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरच चर्चा केली जाईल. असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.