बेळगाव मधील एक सहकारी बँकेचा चेअरमन महिला सहकाऱ्याच्या लैंगिक छळवणुकीमुळे चर्चेत आलेला असताना आता एक महिला बँकही अडचणीत आली आहे. बेनामी मालमत्ता आणि संचालक व त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर जमवण्यात आलेली मोठी रक्कम हेच या अडचणीचे प्रमुख कारण आहे. याबद्दल आयकर खात्याने या बँकेच्या संचालकांना नोटिसा पाठवल्या आहेत.
आयकर विभागाने बँक व्यवस्थापक आणि संचालकांना ३१ जुलै रोजी सहाय्यक आयकर निर्देशक कार्यालयासमोर हजर करून घेऊन चौकशी केली आहे. मालमत्तेचा तपशील आणि खात्यावरील पैशांचे विवरण मागवण्यात आले होते. अजूनही हे प्रकरण सुरूच असून अचानक वाढलेला उत्पन्नाचा मार्ग कोणता याचा तपास केला जात आहे.
सहकारी बँक स्थापन करून जनतेचे कल्याण करण्याचे सोडून आपला बेनामी पैसा लपवण्यासाठी हा वापर केला जात असल्याने या प्रकरणाची जोरात चर्चा आहे. ज्या चेअरमनने लैंगिक छळ प्रकरण केले त्या बँकेतील संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांचे पैसेही या महिला बँकेत असल्याची माहिती मिळत आहे. यावरून सभासद वर्गामध्ये जोरात चर्चा आहे.
बेळगावच्या सहकार क्षेत्रात चांगल्या चेहऱ्याची माणसे आहेत. मात्र काही बँक आणि सोसायट्या याला अपवाद होत असून यामुळे जनतेचा विश्वासघात केला जात आहे. आता आयकर खात्याचा अहवाल काय येतो यावरून पुढील कारवाई काय होणार हे कळणार आहे.
चर्चेत आलेल्या दोन्ही बँका एकमेकांशी संलग्न आहेत. या दोन्ही बँकांत बऱ्यापैकी एकाच घरातील सदस्य संचालक आहेत. दोन्ही बँकेत भरती करताना प्रत्येक उमेदवाराकडून लाख ते दीड लाख रुपये घेतले जातात आणि ती रक्कम त्या महिला बँकेत जमा केली जाते. आयकर खात्याने सहा जणांना नोटीस देऊन हाच मुद्दा जास्त विचारात घेतला आहे. त्या महिला बँकेच्या चेअरपर्सन असलेल्या महिलेने यात जास्त घोटाळा केला असल्याची माहिती आहे. नेहमी अरेरावीची भाषा करून आपला भ्रष्टाचार पुढे रेटून नेला जात आहे.
बहुजन समाजाचे नेतृत्व करणाऱ्या या बँकांतील भ्रष्टाचार दूर होऊन या बँका टिकाव्यात हा उद्देश सर्व सभासदांचा आहे पण पैसे खाऊ संचालक यात गोंधळ करत आहेत.