कर्नाटकात जास्तीतजास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्या युक्त्या वापरून पाहणार आहे. त्यासाठीची त्यांचीची तयारी आत्ताच सुरू आहे. बेळगावची भाजपची सीट पाडवण्यासाठी चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांना अस्त्र म्हणून वापरले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत गोटात ही खलबते सुरू झाली आहेत. हुक्केरी हे माजी मंत्री आहेत, बेळगावचे माजी पालकमंत्री पदी त्यांनी काम केले आहे.बेळगाव शहरावर त्यांची मजबूत पकड आहे तेंव्हा’अंगडी नावाच्या’ केवळ लाटेवर निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात हुक्केरीच योग्य असा विचार पुढे येत आहे.चिकोडीच्या जागेवर आमदार सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत आहे.
जारकीहोळी यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले असले तरी पक्षाने जारकीहोळी चिकोडीच्या जागेवर आपली ताकत लावावी अशी तयारी सुरू केली आहे.
बेळगावच्या जागेसाठी विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचाच पुन्हा एकदा विचार होणार होता पण त्यांचे जारकीहोळी ब्रदर्स शी आलेले वितुष्ट आणि इतर शक्यतांचा विचार करून प्रकाश हुक्केरी यांचीच वर्णी लागणार अशी शक्यता आहे.
सुरेश अंगडी यांनाच भाजप तिकीट देणार हे जवळ पास स्पष्ट आहे. यामुळे भाजपात निर्माण झालेल्या नाराजीचा विचार करून काँग्रेसची ही नवीन खेळी बाहेर येणार आहे असे एक आतल्या गोटातील नेत्याने सांगितले.
एकूणच गेल्या पंधरा वर्षात आपल्या कामांचा वेगळा ठसा निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या विध्यमान खासदाराला हरवण्यासाठी काँग्रेस कडून वेगवेगळी चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे.