ठराविक वय झाले की माणसाने रिटायर्ड व्हायला पाहिजे हा नियम नोकरी उद्योगात पाळला जातो पण राजकारणात नाही. अनुभवी आणि अनेक पावसाळे बघितलेले म्हणून राजकारणात जितके जास्त वय होईल तितके जास्त महत्व दिले जाते. पण ही चूक आहे हे लक्षात येत आहे. तेंव्हा राजकारणात तरुणांना जास्त संधी द्या या मागणीला जोर येत आहे.
सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी झटत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची धुराही आता तरुण पिढीच्या हातात येणे गरजेचे आहे. जुन्या जाणत्या आणि अनुभवी नेत्यांनी मार्गदर्शन करून या तरुणांना भरारी घ्यायला लावली तर समिती पुन्हा आपले वर्चस्व स्थापन करू शकेल असा एक विचार पुढे आला आहे.
काल माजी आमदार संभाजी पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. अनेक तरुण कार्यकर्ते या वाढदिवसाला उपस्थित होते. त्यावेळी संभाजी पाटील यांनी एक विचार मांडला की आता समिती तरुणांच्या हातात देऊ. आपण फक्त मार्गदर्शक म्हणून राहू.
अनेक राजकीय पक्षातही हेच चित्र आहे. जुने नेते पक्ष कार्यकारिणीत असतात. जुन्या पद्धतीने निर्णय घेतात. अनेक वर्षांचे आपले मतभेद, एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण, त्यातून निवडणुकीत मतभेद आणि अनेक गोष्टी होतात. तरुणांना हे मान्य नसते पण करायचे काय? अखेर जुने नेते काय सांगतात ते ऐकून तरुण भरकटत राहतात.
समिती हा पक्ष नाही ती लोकांनी चालवलेली एक संघटना आहे आणि या संघटनेचे अस्तित्व राखण्यासाठी लोकांची निवडणुकीतील इच्छा महत्वाच्या मानल्या जातात. ग्राम पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत या निवडणुकीमध्ये समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत ही एकच गरज आहे. आता ही गरज पूर्ण करायचे असेल तर आता तरुण कार्यकर्ते आघाडीवर असणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा मतभेद आणि पराभवचा धोका दिसत आहे.
लवकरच बेळगाव महानगरपालिकाची निवडणूक लागणार आहे. माझीच समिती खरी, मीच निर्णय घेणार किंव्हा मीच सांगेन तो उमेदवार असा हट्ट करून मनपा निवडणुकीत नुकसान होऊ शकते तेंव्हा नेत्यांनी तरुणांना काय पाहिजे आहे याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा लागेल. निवडून येण्यासाठी सगळ्या जुन्या नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून सर्वच उमेदवारांच्या पाठीशी थांबावे लागेल. नाहीतर हा माझा नव्हे त्याला पाडवतो, तो माझा विरोधक त्याचा काटा काढतो असे म्हणून पुन्हा समितीचेच नुकसान होणार आहे.
कन्नड धार्जिणे राष्ट्रीय पक्ष मनपा निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवू लागले आहेत. त्यांची उमेदवार निवड होत असून मनपा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे उमेदवार उभे राहणार आहेत. याला समितीची तरुण फळी कर्दनकाळ ठरू शकते कामाला लागा.