मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आणि ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकरी आणि कारखानदारामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होताना दिसत आहे. त्यामुळे या वर्षी गळीत हंगाम सुरू होणार की शेतकरी आपली आंदोलनाची धार जोरदार करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सुमारे १५३ कोटी ऊस बिले शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी पालकमंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्या साखर कारखान्याचीच बिले अजून देणे बाकी आहे. मागील दोन वर्षा पूर्वी पासूनची ही बिले आता मिळणेही कठीण होते आहेत. त्यातच शेतकरी आंदोलन छेडत आहेत. त्यामुळे अजून कारखान्याचा धूर निघाला नाही.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कारखान्याला नोटीस पाठविण्यात आली म्हणून त्यांनी आपले राजकीय वजन वापरून जिल्हाधिकारी झियाउला एस यांची बदली केली आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाची धार वाढली आता एकीकडे रमेश जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांचा रोष ओढून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या साखर कारखान्यात ऊस नेणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
गळीत हंगाम आता लवकरच सुरू होणार आहे. नव्या हंगामात एफआरपी प्रमाणे दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आणि मागील थकीत ऊस बिल यामुळे साखर कारखान्याची पंचायत होणार आहे. त्यातच अनेक शेतकरी उसाचे उत्पादन कमी घेत असून यापुढे साखर कारखान्याच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या मात्र गळीत हंगामाला सुरुवात होणार असली तरी मागील थकबाकी आणि ऊसदर याबाबत हंगामापूर्वीच संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.