चालढकल करून मराठी सदस्यांचा रोष ओढवून घेतलेल्या तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी अखेर सर्व मराठी सदस्यांना मराठीतून बैठकीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे सर्व मराठी सदस्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेला हक्क वारंवार तालुका पंचयात बैठकीत मागण्यात येत होता. तालुका पंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुनील अष्टेकर, रावजी पाटील, उदय सिद्दन्नावर, काशिनाथ धर्मोजी, वसंत सुतार, लक्ष्मी मेत्री, मनीषा पालेकर आदींनी याबाबत आवाज उठविला होता याची दखल घेत वारंवार मराठीची मागणी करणाऱ्या सदस्यांना अखेर न्याय मिळाला आहे.
मागील बैठकित सुनील अष्टेकर यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी यांना दाखविली होती. जर पुढील बैठकीत मराठीतून कागदपत्रे मिळाली नाहीत तर जोरदार आंदोलन छेडुन बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा सर्व म ए समितीच्या सदस्यांनी दिला. त्यामुळे याची धास्ती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.
मागील तीन वर्षांपासून मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून अनेकांचा संताप ओढवून घेण्याचे काम तालुका पंचायत अधिकारी करत होते. मात्र आता इतिवृत्त आणि नोटिसा मराठी मध्ये देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील एकूण १५ हुन अधिक जणांना मराठीतून नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.