महाराष्ट्राचे मंत्री आनी आमचे कोलापूरचे चंद्रकांत दादा पाटील तुमास्नी बेळगाव करांच्या वतीनं नमस्कार?
दादा तुमी म्हनं कर्नाटकाच्या सरकारचे पाय मोडण्याचा पर्यतनात हाईसा, आमची एक ईनंती हाय….. दादा कर्नाटकाचं सरकार पाडवा आनी आमचा सीमाप्रश्न बी सोडवा….
चंद्रकांत दादा पाटील आपण सीमाभागाचे महाराष्ट्र सरकारने नेमलेले पालकमंत्री आहात. याचा विसर पडू देऊ नका. आपण विमानतळ सोडून बेळगावात आत आला नाहीत. आमच्या कार्यक्रमात येण्याचे सोडून तुम्ही हुट्टीदरे कर्नाटकातच हुट्ट बेकू म्हणून आमचीच काय ते हुट्ट काय हट्ट करून गेलात. आता तर तुम्ही थेट कर्नाटक सरकार पाडवायला निघाला असं ऐकायला मिळतंय.
दादा तुम्ही कर्नाटकाचे सरकार पाडवा आम्हाला काय सोयरसुतक नाही. पण एक सरकार पडून दुसरे जे येईल ते तुमचे असेल तेंव्हा ते सरकार सीमाभागाच्या बाबतीत तुमचे ऐकेल काय…? यावरही जरा विचार करा.
जारकीहोळी आणि तुमची दोस्ती पहिल्यापासून आहे हे सगळ्यांना माहित आहे. या दोस्तीचा फायदा तुम्हा दोघांनी वरचेवर घेतला आहे हे सुद्धा मान्य. पण तुम्ही आमचे पालक असून आमची अशी कायमच वांगी बटाटी करत राहिलात तर आम्ही कुणाकडे बघायचे?
राजकीय पेच निर्माण करणारे तुम्ही धुरंधर राजकारणी आहात. या पेचात आपल्या स्व जनांचा फायदा कसा करून घ्यायचा हे माहीत नसेल तर जरा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. आणि होऊन जाऊद्या गनिमी कावा.
दादा आणखी एकदा ईनंती सरकार पाडवा, रडवा, नडवा पन सीमाप्रश्न तेवढा सोडवा.
-सामान्य सीमा वासीय