शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास काही समाजकंटकांनी भेंडीबाजार सार्वजनिक मंडळाच्या मंडपावर दगडफेक केल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने उपस्थित होऊन परिस्थिती निवळली आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून त्या समाजकंटकांचा शोध सुरू आहे.
शुक्रवारी सायंकाळ पासून मध्यरात्री पर्यंत एकीकडे गणेश दर्शन करण्यासाठी भाविक वाढले. तर दुसरीकडे मोहरमची ताबुत विसर्जन मिरवणूक सुरू असताना या परिस्थितीत शहराची शांतता बिघडविण्याचा उद्देश ठेऊन काही जणांनी हा प्रकार केला.
या दगडफेकीने त्या गणेशोत्सव मंडळाची मूर्तीला दुखापत झाली होती व एक कार्यकर्ताही जखमी झाला. लगेचच पोलिसांनी मंडप झाकून मूर्तीची दुरुस्ती केली आणि मंडप पुन्हा खुला केला आहे.
ते समाजकंटक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. उद्या गणेश विसर्जन आहे तेंव्हा या घटनेचा फायदा घेऊन कुणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि पोलीस दलाने केले आहे.
या घटनेत ज्यांनी दगडफेक केली त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी झाली आहे.